एकनाथ शिंदेचा नारा : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, मग देवेंद्र फडणवीसांचं काय?

मंगळवार, 13 जून 2023 (17:18 IST)
आजचे, म्हणजे 13 जूनची मराठी वर्तमानपत्रं महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले, ते एका नव्या चर्चेचा मुद्दा घेऊनच. या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पानभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जाहिरात दिलीय. या जाहिरातीचा मथळा आहे – ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’
 
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ‘केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्र देवेंद्र’ अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बऱ्याचदा दिली गेलीय. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या या नव्या घोषणायुक्त मथळ्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना अक्षरश: उधाण आणलंय.
 
मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील या जाहिरातीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचेच फोटो आहेत.
 
मुख्य म्हणजे शिवसेनेची जाहिरात असूनही त्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही.
 
जाहिरातीत मजकूर काय आहे?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेल्या या जाहिरातीवरचा मजकूर नव्या प्रश्नांना तोंड फोडणारा आहे. एका सर्वेक्षणाचा हवाला देत, या जाहिरातून दावा करण्यात आलाय की, एकानाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी 26.1 टक्के, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी 23.2 टक्के पसंती आहे. आणि हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य मुद्दा ठरतोय.
आता या जाहिरातीतून आणि जाहिरातीच्या मजकुरातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यातील पहिला प्रश्न असा की, ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ मग महाराष्ट्र भाजपमधील ताकदवान मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांचं स्थान कुठे?
 
शिवाय, ‘पुन्हा मुख्यमंत्रिपदी’ येण्यासाठी एकनाथ शिंदेंना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती असल्याचा दावा करणारी शिंदेंची शिवसेना काय सांगू पाहत आहे? आणि एकूणच या जाहिरातीचे राजकीय अर्थ काय आणि याचे पडसाद काय उमटू शकतात? या प्रश्नांची उत्तरं आपण राजकीय विश्लेषकांशी बोलून जाणून घेणार आहोत.
 
तत्पूर्वी, भाजपसह इतर राजकीय पक्षांचं यावर काय म्हणणं आहे, हे पाहूया.
 
बाळासाहेबांचा फोटो छापायला शिंदेंची तंतरली – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जाहिरातीवर छापला नसल्यावर राऊतांच्या टीकेचा रोख दिसून येतो.
 
संजय राऊत म्हणाले की, “कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली ही जाहिरातबाजी. या आनंदाच्या क्षणी मा. मु. एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडलाय. आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला. जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकायला यांची तंतरली.”
 
तसंच, राऊत पुढे म्हणाले की, “मोदी-शाहांचे इतके भय? बाकी ते सर्व्हे, फडणवीस हे तुमचे चघळायचे विषय. बाळासाहेबांचा फोटो टाकायला तंतरली हे मान्य करा. ये पब्लिक हैं.. सब जानती है..”
 
भाजपचे नेते म्हणतात...
या सर्व्हेबाबत भाजपची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीन भाजप नेते अतुल भातखळकर यांच्याशी बातचित केली.
 
भातखळकर सांगातत, “मुळात हा एका वृत्तवाहिनीने केलेला सर्व्हे आहे आणि त्याची जाहिरात करणारी ती जाहिरात आहे. त्यामुळे त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या सर्व्हेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की देशात नरेंद्र मोदींची सत्ता पुन्हा येणार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा मोदींना पसंती मिळत आहे.”
 
या सर्व्हेत भाजपला 36 टक्के मतं आणि 135 पेक्षाजास्त जागा मिळतील असंसुद्धा सांगण्यात आलंय, याकडे भातखळकर यांनी लक्ष वेधलं.
 
पण मग ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या भाजपच्या नाऱ्याचं काय होईल? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय? असे सवाल केल्यावर भातखळकर म्हणतात, “म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीचं सरकार येईल हे तुम्ही मान्य करता याबद्दल तुमचं अभिनंदन. पण, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे की अगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यातून वेगळे काही अर्थ निघत नाहीत.”
 
या जाहिरातीचा राजकीय अर्थ काय?
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे हे या जाहिरातीचा अर्थ सांगताना म्हणतात की, आपली लोकप्रियता कमी झाली नसल्याचं सांगण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेनं केलेली ही जाहिरात आहे.
 
विजय चोरमारे पुढे म्हणतात की, “या जाहिरातीतून फडणवीसांना आव्हान देत असल्याचं बोललं जातंय, पण वास्तवात फडणवीसांना आव्हान द्यावं इतकी एकनाथ शिंदेंची क्षमता दिसत नाही. शिवाय, फडणवीस स्वत:च म्हणाले होते की, आगामी निवडणूक शिंदेंच्या नेतृत्त्वात लढू. म्हणजे, हा शिंदे-फडणवीसांच्या रणनितीचाही भाग असू शकतो.”
 
तसंच, “एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांची जी प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण झालीय. विशेषत: ठाकरे गटाकडून त्यांना मिंधे सरकार, खोके सरकार वगैर म्हटलं जातं.
 
या पार्श्वभूमीवर अशा सर्वेक्षणातून शिंदे हे सांगू पाहतायेत की, बंडानंतरही राज्यात आमची लोकप्रियता कमी झाली नाहीय. याच उद्देशानं ही जाहिरात दिलीय,” असंही विजय चोरमारे यांना वाटतं.
 
‘आजच्या जाहिरातीनं भाजप कार्यकर्ता अस्वस्था झाला असणार’
तर ही जाहिरात म्हणजे फडणवीसांना आव्हान आहे का, या प्रश्नावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीसांना वगळून एकनाथ शिंदेंच्या बाजूनं आपलं वजन वापरतील, असं काही दिसत नाही. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं हा उद्धव ठाकरेंना दिलेला भाजपचा शह आहे. असं असतानाही पुढच्या निवडणुकीनंतरही शिंदे मुख्यमंत्री राहतील, असं शिवसेनेला वाटत असेल तर स्वत:ला अडचणीत आणत आहेत.
 
“आजही भाजपची लोकप्रिय घटली आहे का, असा प्रश्न हल्ली उभा राहत असला, तरी शिंदेंपेक्षा फडणवीस नक्कीच लोकप्रिय आहेत.”
 
तसंच, नानिवडेकर पुढे म्हणतात की, “मोदी-शाह यांच्या काळातील नवी भाजप साधरणत: सहकारी पक्षांना डोक्यावर बसवत नाहीत. त्यामुळे शिंदेंना ते मर्यादेपलिकडे पुढे घेऊन जाणार नाहीत.
 
“भाजपचा कार्यकर्ता फडणवीसांच्या मागे असलेला दिसतो. आजच्या जाहिरातीनं तो अस्वस्थ झालेला असणारच. मात्र, शिंदेंनी स्वत:च्या लॉन्चिंगसाठी अशाप्रकारे जाहिराती वगैरे करणं मोठ्या पल्ल्यासाठी अडचणीचे ठरू शकतं.”
 
“शिंदेंनीही या बंडामागे फडणवीसांचा हात असल्याचं मान्य केलं होतं. या बंडातले फडणवीस मोठे कलाकार आहेत, असं विधिमंडळात म्हटलं होतं. पण त्यांनी फडणवीसांना दुखवायला जात असतील, तर लांबच्या पल्ल्यासाठी ते त्यांचा मित्रही गमावतील,” असंही नानिवडेकर म्हणतात.
 
शिंदे जाहिरातीतून काय संदेश देत आहेत?
वरिष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख म्हणतात की, “एकनाथ शिंदेंना वाटत असणार की, लोक आम्हाला धनुष्यबाणावर मतं देतील, 40 आमदार, 13 खासदार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद भूषवल्यावर शिंदे पर्यायी भूमिकेत जाण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. म्हणजेच, 2024 साली शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेच असतील, यात शंका वाटत नाही.”
 
मात्र, त्याचबरोबर देशमुख पुढे म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की, भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व माझ्या पाठीशी आहे. या जाहिरातीत त्यांनी अमित शाह, फडणवीस किंवा भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ यांचे फोटो सुद्धा वापरले नाहीत. त्यांनी थेट मोदींचा फोटो वापरलं आहे. यातून ते केंद्रीय नेतृत्त्वाचा आपल्याला पाठिंबा असल्याचाच संदेश देत आहेत.”
 
रविकिरण देशमुख यांनी फडणवीस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं.
 
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप या जाहिरातीवरून सुरू झालेल्या चर्चेवर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शिंदे गट या जाहिरातीवर काय स्पष्टीकरण देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती