कोल्हापूर ते जळगाव, नगर ते अकोला... महाराष्ट्रात धार्मिक तेढ का वाढतेय?

सोमवार, 12 जून 2023 (21:52 IST)
धर्माभिमान, धार्मिक मोर्चे, या मोर्चांमधून द्वेषमूलक वक्तव्यं, धार्मिक प्रतिकांचा अपमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे गेल्या तीन-एक महिन्यात महाराष्ट्रात हिंसाचारांची वाढ झालीय.
 
हिंदू आक्रोश मोर्चा, औरंगाबादचं नामांतर, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट, तसंच व्हॉटअसअपचे स्टेटस या गोष्टी आतापर्यंतच्या विद्वेषी वातावरणाला कारणीभूत ठरल्यात.
 
‘पुरोगामी राज्य’ म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दर दोन-तीन दिवसांआड ‘दोन गटात वाद’ आणि मग ‘कलम 144 लागू’ असे मथळे न्यूज चॅनेल्सच्या पडद्यांवर आणि वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दिसू लागले आहेत.
 
महाराष्ट्रात हे नेमकं काय सुरू आहे? धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी अचानक का वाढल्या? या विद्वेषामागचा हेतू काय? या हिंसा उस्फूर्त प्रतिक्रिया की नियोजित कट? असे नाना प्रश्न कुणाही विवेकी महाराष्ट्रीय व्यक्तीच्या मनात येऊ शकतात.
 
सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय नेते यांच्यासमोर हेच प्रश्न घेऊन आम्ही गेलो आणि त्यांना काय वाटतं, त्यांचं विश्लेषण काय, हे जाणून घेतलं. या वृत्तलेखातून आपण ‘महाराष्ट्रातील या वाढत्या हिंसाचारांमागच्या’ कारणांचा आढावा घेऊ.
 
तत्पूर्वी, गेल्या तीन-एक महिन्यात कुठे कुठे हिंसाचार झाला, यावर एक नजर टाकू. त्यानंतर आपल्या मूळ विश्लेषणाकडे येऊ.
 
नगर, जळगाव, कोल्हापूर... हिंसेचा वणवा!
अहमदनगरमधील संगमनेर, शेवगाव, मिरजगाव, धुळे, जळगावमधील अंमळनेर, कोल्हापूर, औरंगाबाद यांसारख्या 10 हून अधिक ठिकाणी गेल्या दोन-तीन महिन्यात धार्मिक मुद्द्यांवरून हिंसाचाराच्या घटना घडल्या.
 
सामाजिक सौहार्दासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
काही संघटनांनी यावरून कोल्हापूर बंदचीही हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. तसंच, अश्रुधूराच्या नळकांड्याही काही ठिकाणी फोडण्यात आल्या. या प्रकरणी तीन पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 36 जणांना तब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील 3 तरूण अल्पवयीन आहेत.
 
अशीच परिस्थिती इतर ठिकाणी सुद्धा. जळगावच्या अंमळनेरमध्ये तर लहान मुलांच्या भांडणावरून दोन-तीन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद दगडफेकीपर्यंत गेला आणि शेवट दोन गटातल्या वादात झाला.
 
अमळनेरच्या या घटनेत काही वाहनांचे नुकसान झाले, तसंच सहा पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार नागरिकही जखमी झाले.
 
अकोल्यात इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टवरून वाद झाला आणि त्याचं रुपांतर दोन गटातल्या धार्मिक हिंसाचारात झालं.
 
अहमदनगरच्या शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. परिणिती हिंसाचारापर्यंत गेली.
 
औरंगाबादमध्ये 29 मार्चच्या मध्यरात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसान दगडफेक आणि नंतर जाळपोळ करण्यात झालं.
रामनवमीच्या तयारीसाठी काही तरुण जमले असताना फटाके फोडत, ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. मग तरुणांच्या दुसऱ्या गटानं येऊन ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या. आधी 10 तरुण होते. मग 30 ते मग 30 ते 40 जण जमा झाले. मग दगडफेकीला सुरुवात झाली. जमावानं पोलिसांच्या 10 पेक्षा अधिक गाड्या जाळल्याचं, त्यांची तोडफोड केल्याचंही त्यांनी सागितलं.
 
एकीकडे महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ म्हटलं जातं, तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरूनही झालेला वाद, दोन धार्मिक गटातल्या हिंसाचारापर्यंत इतक्या वेगानं आणि सहज पोहोचतो, याबाबतची चिंता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून व्यक्त केली जातेय.
 
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडूनच आम्ही महाराष्ट्रातील या तणावपूर्ण वातावरणामागचं कारण आणि त्यावर प्रामुख्यानं, तातडीनं करता येतील, असे उपाय समजून घेतले.
 
महाराष्ट्रात हिंसाचाराच्या घटना वाढण्याची कारणं काय?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘निर्भय बनो’ अभियानातील सदस्य डॉ. विश्वंभर चौधरी यांच्याशी बोलून आम्ही वाढत्या हिंसाचाराबाबत चर्चा केली.
 
डॉ. विश्वभंर चौधरी म्हणतात की, “महाराष्ट्रात घडणाऱ्या हिंसक घटनांच्या मूळ निमित्ताकडे एकदा पाहा. यातल्या जास्तीत जास्त घटनांचं निमित्त हास्यास्पद आहे. कुणीतरी अमूक-तमुक व्यक्तीचा फोटो ठेवला, कुठे क्षुल्लक वाद होतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकतो आणि त्याचं रुपांतर धार्मिक हिंसेत झालं अशा प्रकारची निमित्तं दिसतात. मग कुणीतरी ‘बंद’ची हाक देतो आणि हिंसेला प्रोत्साहन मिळतं.
 
“ऑफ-सीझन हिंसाचार कसा घडवायचा, याचं तंत्र आता आणलं गेलंय का? या हिंसा व्यवस्थित नियोजित दिसतात. यात दोन्ही धर्मांमधील धर्मांध सामील आहेत. एका गावात हिंसा घडते, तशीच घटना दुसरीकडे कशी घडते? यामागे स्पष्टपणे हिंदुत्त्ववादी संघटना असून, त्यांना काही मुस्लीम संघटना साथ देतात.
 
“भाजप, शिंदे गट आणि त्यांना साथ देणाऱ्या मुस्लीम संघटना, या सगळ्यांनी हे वातावरण तयार केलंय. जेणेकरून लोकांच्या जगण्या-मरण्याच्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न आहे.”
 
डॉ. विश्वंभर चौधरींच्या मताशी सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष सुभाष वारे हेसुद्धा सहमत होत म्हणतात की, जाणीवपूर्वक वातावरणातला तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातून द्वेष पसरवला जातोय.
 
सुभाष वारे पुढे म्हणतात की, “समजा कुणी औरंगजेबाचा फोटो स्टेटस म्हणून ठेवलं असेल, तर त्याला भेटून चर्चा करून तो प्रश्न सोडवला पाहिजे. मात्र, आपल्याकडे अशा प्रकारानंतर ज्या हिंसक प्रतिक्रिया उमटततात, त्यात प्रश्न सोडवण्याचा उद्देश दिसून येत नाही. त्याऐवजी निमित्त करून वातावरण तापवून मुस्लीम समाजाला निशाणा बनवला जातोय.”
 
याच मुद्द्याला पुढे नेत ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नालाही हात घालतात. डॉ. चोरमारे म्हणतात की, “यात कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी मोठी असते. पण बहुतेक ठिकाणी ही यंत्रणा अपयशी ठरलेली दिसते आणि ही यंत्रणा अपयशी कधी ठरते, जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून या यंत्रणेला ‘काहीही न करण्याची’ सूचना दिली जाते.”
 
केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांना लाभ मिळावा, या उद्देशानंच आताचे हिंसाचार होताना दिसतात, असंही डॉ. विजय चोरमारे म्हणतात.
 
‘झुंडीनं प्रश्न सोडवणं लोकशाहीसाठी धोकादायक’
अशा घटनांमुळे धार्मिक तेढ वाढून समाजात दुरी निर्माण होते, हा प्रमुख आणि पहिला परिणाम आहेच. मात्र, त्यापलिकडेही परिणाम दिसून येतात.
 
भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी सुरेश खोपडे म्हणतात की, “महाराष्ट्रात घडणाऱ्या या हिंसा मोठ्या काळजीची गोष्ट आहे. एखाद्या राज्याला प्रगती करायची असेल, तर पहिली अट असते की, ते राज्य किती सुरक्षित आहे. सेन्स ऑफ सिक्युरिटी असा इंग्रजीत शब्द आहे. ही सेन्स ऑफ सिक्युरिटीच आता संपत चाललीय आणि ही चिंतेची बाब आहे. शिवाय, प्रगतीसाठी अडसर ठरणारी गोष्ट आहे.”
 
याच मुद्द्यावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी सुधाकर सुराडकर म्हणतात की, कुठलेही उद्योग वगैरे वाढण्यासाठी सुरक्षिततेची भावना आवश्यक आहे. अशांत क्षेत्रात उद्योग वाढत नाही.
 
सुभाष वारेही उद्योगाच्या मुद्द्याला हात घालतात. तसंच, महाराष्ट्रानं आजवर जपलेल्या संस्कृतीचाही उल्लेख करतात. ते म्हणतात की, “अशा हिंसक घटनांचा तातडीचा परिणाम महाराष्ट्रातील व्यापार-उदीम आणि उद्योगधंद्यांना फटका बसणार आहे. कोल्हापुरातल्या घटनेकडे पाहिल्यास, तिथे महालक्ष्मी मंदिराशेजारील सर्व दुकानं बंद होती. परिणामी तिथल्या दुकानदारांना फटका बसला. हेच औरंगाबादमध्ये झालं. महाराष्ट्राच्या अर्थकारणावर याचा थेट परिणाम होईल आणि हे काही योग्य नाही.”
 
“उत्तरेकडच्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात शिस्तीची आणि संवेदनशील संस्कृती आहे. रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणं आणि झुंडीनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, हे लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे,” असंही सुभाष वारे म्हणतात.
 
हिंसाचार रोखण्यासाठी काय केलं पाहिजे?
डॉ. विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील वाढत्या द्वेषाला रोखण्यासाठी आणि विविध समाजांमध्ये सुसंवादी वातावरण निर्माण व्हावं, म्हणून ‘निर्भय बनो’ अभियनाअंतर्गत महाराष्ट्रभर दौरा करत आहेत.
 
डॉ. चौधरी बीबीसी मराठीशी बोलताना हिंसाचार रोखण्यासंदर्भात म्हणाले की, “लोकांना हे कळून घ्यावं लागेल की, हा राजकारणाचा भाग आहे. धर्म हा राजकारणासाठी वापरला जातो, हे समजून घ्यावं लागेल.
 
“तसंच, कोल्हापुरात जसं कपबश्या विकणाऱ्याचं हिंसाचारादरम्यान नुकसान केलं गेलं आणि नंतर कुणा हिंदूने त्याला मदत केली. अशा मदतीसाठी आपण पुढे आलो पाहिजे आणि ही उदाहरणं समोर ठेवली पाहिजेत. तुमच्या हिंसाचारानं हिंदू-मुस्लीम ऐक्य कमी होणार नाही, हे धर्मांधांना कळलं पाहिजे.
 
“आम्ही याच उद्देशानं ‘निर्भय बनो’सारखं अभियान राबवत आहोत. एकूणच विवेकी आणि सर्वधर्म समभाव मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, हे दाखवून दिलं पाहिजे.”
 
सुभाष वारे ‘सलोखा समिती’चा उपाय सूचवतात. ते म्हणतात की, “शासनाच्या सलोख्या समित्या असतात. त्या पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन सक्रीय करायला पाहिजे. पोलिसांनी हे केल्यास या समित्या नीट काम करतील.
 
“दुसरं असं की, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात विविध समाजगटांमध्ये सुसंवाद राहण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नागरिक म्हणून आपल्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरही आपण दिलेली असते.”
 
सुभाष वारे यांनी सलोखा समितीचा उल्लेख केला. याच सलोखा समितींसारखा उपक्रम निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी भिंवडी दंगलीदरम्यान अमलात आणला होता. मोहल्ला कमिटी असं त्यांनी त्यास नाव दिलं होतं आणि पुढे भिवंडी पॅटर्न म्हणून सर्वत्र प्रसिद्धही झालं होतं.
 
पोलिसांनी ‘फायर ब्रिगेड’च्या भूमिकेतून बाहेर यावं – सुरेश खोपडे
हिंसाचार कसे रोखता येतील, यावर बोलताना सुरेश खोपडे पोलिसांच्या भूमिकेचा उल्लेख करतात.
 
सुरेश खोपडे म्हणतात की, “हिंसाराचारासारख्या घटनांकडे पाहण्याची पोलिसांची भूमिका बऱ्याचदा फायर ब्रिगेडसारखी असते. म्हणजे, तयारीत असतात, पण घटना घडण्याची वाट बघत बसतात. घटना घडली की मग जातील, लाठीमार करतील, लोकांना पकडतील, केसेस करतील. मग पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतील आणि दुसरी घटना घडण्याची वाट बघत बसतील. पण ती घटना होऊच नये, यासाठी प्रयत्न करत नाहीत.”
 
कोल्हापूर काय किंवा पूर्ण महाराष्ट्र काय, अशा घटना होऊच नये, यासाठी प्रयत्न करायला हवा, असंही खोपडे म्हणतात.
 
यावेळी सुरेश खोपडे त्यांनी भिवंडीत राबवलेल्या मोहल्ला कमिटीच्या उपक्रमाचा उल्लेख करतात.
 
ते म्हणतात की, “भिवंडीत मी मोहल्ला कमिटीचा प्रयोग राबवला होता. तसा प्रयोग राबवणं आवश्यक आहे. यासाठी वेगळी आर्थिक तरतुदीची आवश्यकता नाही, अधिकचे पोलीस नकोत. पण पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची इच्छा दिसत नाही.”
 
सुरेश खोपडेंनी राबवलेला मोहल्ला कमिटीचा उपक्रम असा होता : 10 हजार लोकसंख्येसाठी एक मोहल्ला कमिटी स्थापन करण्यात आली होती. या मोहल्ला कमिटीत हिंदू-मुस्लिमांना, तसंच पत्रकारांनाही समाविष्ट करून घेण्यात आलं. या मोहल्ला कमिटीच्या अध्यक्षपदी पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असे. दर 15 दिवसांनी एक बैठक घेतली जाई. यातून हिंदू-मुस्लिमांमध्ये संवाद वाढू लागल्याचं दिसून आलं होतं.
 
‘फूट फूट पेट्रोलिंग’ची आवश्यकता – सुधाकर सुराडकर
निवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर पोलिसांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात.
 
सुधाकर सुराडकर म्हणतात की, “पोलिसांनी स्वत:च या द्वेष पसरवणाऱ्या घटनांचा नीट अभ्यास करून निष्पक्षपातीपणे काम केलं पाहिजे. कुणाचीही बाजू घ्यायला नको. होतं काय की, पोलिसांचाच अभ्यास नसतो. पोलिसांनी प्रो- अॅक्टिव्ह असायला हवं. अन्यथा, अफवांचा प्रसार पोलीस हाताळू शकणार नाहीत.
 
“कुठल्याही धर्मातील गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हायला हवी. तसं आता घडत नाही. पोलीस सुद्धा जाती-धर्मात विभागले गेलेत. त्यामुळे पोलीस प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम पोलिसांना चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे. आपल्याला जास्त पोलीस नकोत, चांगले पोलीस हवेत.
 
“पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे. पोलिसांनी ‘फूट फूट पेट्रोलिंग’ करायला हवं. म्हणजे आपल्या हद्दीत काय घडतंय, याची पूर्ण कल्पना पोलिसांना असायलाच हवी.”
 
“पोलिसांचा धाक चुकीचं काम करणाऱ्यांना वाटला पाहिजे. पण मी जबाबदारीने बोलतो की, आज नेमकं उलट आहे. आज चांगल्या लोकांना पोलिसांचा धाक वाटतो. बदमाश बिनधास्त दिसतात,” असंही सुधाकर सुराडकर म्हणतात.





Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती