मला तोंड उघडायला लावू नका : संजय राऊत

सोमवार, 28 डिसेंबर 2020 (16:14 IST)
बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
भाजपाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असंही सांगितलं जातं आहे. धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला असाही आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे जे खंदे समर्थकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
भाजपाला महाराष्ट्रात सत्तेपासून वेगळं ठेवल्यामुळे ईडीचा वापर केला जातो आहे. एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. मात्र आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कुणी नामर्दपणे असे वार करत असेल तर शिवसेनेला जशास तसं उत्तर देईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपाचे तीन लोक ईडीच्या कार्यालयात येत आहेत आणि जात आहेत. आम्ही कोणत्याही नोटिशीला घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती