धनंजय मुंडेंना दोन आठवड्यांचा दिलासा

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (16:06 IST)
बीड येथील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. 
 
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आजच्या दिवशी घेण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. अखेर आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या प्रकरणी दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
 
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. कारखान्याच्या जमीन खरेदी करतेवेळी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती