मुंबईत कोविड सेंटर घोटाळा : ईडीचा मोठा खुलासा, जाणून घेऊ काय आहे घोटाळा

शुक्रवार, 23 जून 2023 (12:36 IST)
मुंबई - अंमलबजावणी संचालनालय(ED) नं मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटर घोटाळ्याबाबत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी असलेले सूरज चव्हाण यांच्या घरीही १७ तास ईडीने चौकशी केली. या तपासात मुंबई महापालिकेत कोविड काळात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तपासात २ हजार रुपयांचे बॉडीबॅग ६८०० रुपयांना खरेदी करण्यात आली. हे कंत्राट महापालिकेचे तत्कालीन महापौर यांच्या आदेशावर देण्यात आले होते असा खुलासा झाला आहे.
 
ED च्या तपासात बीएमसीकडून कोविड काळात जी औषधे खरेदी ती बाजारात २५-३० टक्के स्वस्त मिळत असल्याचे समोर आले. याचा अर्थ जास्त दर देऊन महापालिकेने औषधांची खरेदी केली. विशेष म्हणजे याबाबत नोटीस जारी होऊनही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला. सूत्रांनुसार, लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची संख्या BMC च्या बिलात दाखवलेल्या संख्येपेक्षा ६०-६५ टक्के कमी होती. बिलिंगसाठी कंपनीने ज्या डॉक्टरांची नावे दिली जे त्या संबंधित केंद्रात चुकीच्या पद्धतीने काम करत होते किंवा करतच नव्हते असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे.
 
काय काय सापडले धाडीत?
ईडीने बुधवारी सकाळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील केके ग्रँड इमारतीतील घरावर छापा टाकला. येथून ईडीच्या कारवाईला सुरुवात झाली. सांताक्रूझ, मालाड, परळ, वरळी, वांद्रे येथील १५ ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या. यात ६८ लाख रुपये रोख रक्कम, १५ कोटी रुपयांच्या विविध बँक खात्यांमध्ये मुदत ठेवी, अडीच ते तीन कोटी रुपयांचे दागिने आणि ५० ठिकाणच्या १५८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
काय आहे घोटाळा?
मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडी बॅगची तिप्पट दराने खरेदी झाली. २ हजार रुपयांची बॉडी बॅग ६,८०० रुपयांना खरेदी करण्यात आली. बोगस डॉक्टर स्टाफ ठेवून त्यांचा पगार उचलण्यात आला. ६० ते ६५ टक्के स्टाफ नसताना त्यांच्या नावाने पेमेंट दिले जात होते. कोरोना काळात औषधांचीदेखील ३० टक्के चढ्या दराने खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने खोटी माहिती देऊन कंत्राटे घेतल्याचा आरोप आहे. या कंपनीला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकलेले असताना मुंबई महापालिकेने त्यांना कंत्राट कसे दिले, असाही आरोप होत आहे.
 
या प्रकरणात गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकार्‍यांसह मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरावर छापा मारण्यात आला. वांद्रे पूर्व येथील रुस्तमजी ओरियाना टॉवरमधील चौथ्या मजल्यावर संजीव जयस्वाल राहतात. यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवर्तक सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या सर्व १५ ठिकाणांहून ईडीने कोट्यवधींचे घबाड गोळा केले आहे. त्यासोबतच काही चॅट्सही ईडीच्या हाती लागले आहेत. यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
 
गुरुवारी मुंबई महापालिकेच्या खरेदी खाते विभागात तपास करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि ईडीचे अधिकारी उपस्थित होते. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून कोरोना काळात कोविड सेंटर उभारणी आणि वैद्यकीय उपकरण खरेदी करण्यात आली होती. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप करीत त्याची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजीत मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
चहल पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात
ईडीच्या पथकाने गुरुवारी भायखळ्यातील मुंबई महापालिकेच्या सेंट्रल पर्चेसिंग युनिटमध्ये धडक देत चौकशी केली. ईडीच्या अधिकार्‍यांनी कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. ईडीने बुधवारी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या निवासस्थानी छापे टाकून चौकशी केली आहे. या सर्व प्रकरणात महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ईडीने आधी चौकशी केली होती, परंतु आता पुन्हा चहल यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
 
IAS संजीव जयस्वाल यांच्या नावे १०० कोटींहून अधिक प्रॉपर्टी  
ईडीने बुधवारी कोविड सेंटर घोटाळ्यातील १५ ठिकाणी छापेमारी केली. त्यात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरीही धाड टाकली. संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. कोविड काळात ते बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त होते. तपासावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना जयस्वाल आणि कुटुंबाच्या नावे अनेक संपत्ती असल्याचे कागदपत्रे सापडली. त्यात २४ संपत्तीचे दस्तावेज आढळले, जे मुंबईसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरातील मालमत्ता आहे. जयस्वाल यांच्या घरातून १०० कोटींच्या मालमत्तेचे पुरावे आणि १५ कोटींहून अधिक रुपयांची एफडी असल्याचे कागदपत्रे सापडली आहेत. तर जयस्वाल यांनी सांगितले की, जवळपास ३४ कोटी रुपये संपत्ती त्यांना सासरच्यांकडून मिळाली. जी पत्नीला गिफ्ट देण्यात आली. तर एफडीही पत्नीच्या वडिलांनी तिला भेट म्हणून दिली आहे. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती