हरवलेल्या 64 जणांना 11 महिन्यात शोधलं, कुटुंबीयांसाठी खुबाळकर ठरले 'खाकीतील देवदूत'

मंगळवार, 26 मार्च 2024 (15:14 IST)
देवदूत कोणत्याही वेशात येऊ शकतो असं म्हटलं जातं. पण नागपूरच्या अनेक कुटुंबांसाठी एक देवदूत खाकी वर्दीत आल्याचं दिसलं. एक दोन नाही तर तब्बल 64 कुटुंबीयांच्या मदतीला सुधीर खुबाळकर धावून आल्यानंतर त्यांना खाकीतला देवदूतच म्हटलं जाऊ लागलं आहे.घर सोडून गेलेले किंवा हरवलेल्या 64 जणांना खुबाळकरांनी 11 महिन्याच्या कालावधीत शोधून काढलं. त्या खुबाळकरांची ही गोष्ट.
 
''माझ्या काकांना कधी कधी फीट येते. ते कुठेही चक्कर येऊन पडतात आणि त्यानंतर घर विसरतात. दोन महिन्यांपूर्वी ते नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता उठून लकडगंजला गेले होते. पण, सायंकाळ झाली तरी काका घरी आले नाहीत. आम्ही त्यांना खूप शोधलं. पण, काका कुठेच भेटले नाहीत.''हे सांगताना लोकेश रंगारी यांचा कंठ दाटून आला होता. त्यांचे 55 वर्षीय काका श्याम रंगारी हे नागपुरातील शांतीनगर भागातल्या आंबेडकर नगरमध्ये राहतात.
 
पण, एक दिवस ते घरातून गेले तर परतलेच नव्हते. शेवटी त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांनी लोकेश यांच्या काकांना शोधून कुटुंबासोबत भेट घालून दिली.खुबाळकरांनी फक्त रंगारी यांचे काकाच नाहीतर अशा अनेकांना शोधले आहे.
 
खुबाळकरांनी हरवलेल्या, घरातून अचानक निघून गेलेल्या तब्बल 64 जणांना गेल्या 11 महिन्यात शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. यात जास्तीत जास्त मुली आणि महिलांचा समावेश आहे.
खुबाळकर यांनी 2023 मध्ये 25 महिला आणि 29 पुरुषांना शोधून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं, तर 2024 मध्ये तीन पुरुष आणि 7 महिलांना शोधून कुटुंबीयांकडे सोपवलं.
 
यामध्ये 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या हद्दीत आता फक्त एक महिला आणि एक पुरुष मिसिंग आहेत. खुबाळकर त्यांचाही शोध घेत आहेत.
"माझी मुलगी सकाळीच ट्युशन क्लासला गेली होती. पण, ती घरी आलीच नाही. तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन केले. ती त्यांच्याकडे पण नव्हती. घरात तिची आई रडत होती. मी मुलीच्या शोधात नागपुरात भटकत होतो.
 
पण, मुलगी काही भेटली नाही. घरात सगळे टेंशनमध्ये होते. शेवटी पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार दिली’’, हे सांगताना 18 वर्षीय सीमा (बदलेले नाव)च्या 50 वर्षीय वडिलांचा उर भरून आला.
पण, मुलगी सापडल्यानंतरचा आनंदही सांगायला ते विसरले नाहीत. आमची मुलगी एकाच दिवसांत सापडली. ती उज्जैनला गेल्याचं समजलं आणि पोलिस सुधीर खुबाळकर यांनी सिमाला शोधून आणलं.
 
तिला पाहून तिच्या आईच्या जीवात जीव आला, हे सांगताना ते खुबळकरांना धन्यवादही द्यायला विसरले नाहीत. खुबाळकर सर देवदुतासारखे आमच्यासाठी धावून आले, असंही ते म्हणाले.
गणपत (बदलेलं नाव) हे नागपुरात राहतात. पण, त्यांची मुलगी सीमा (बदलेलं नाव) ट्युशनला जातो सांगून घरातून निघून गेली. शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांनी तिला शोधून आणलं.
 
हरवलेली मुलगी आई-वडिलांना परत मिळाली, एक हरवलेली पत्नी आपल्या पतीला परत मिळाली, कुठे मुलांना हरवलेला बाप मिळाला अशा कितीतरी कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचं काम सुधीर खुबाळकर करतात.
पण, ते घरातून निघून गेलेल्या या लोकांना कसं शोधतात? त्यांची समजूत कशी काढतात? त्यांनी हरवलेल्या लोकांची कुटुंबीयांसोबत भेट कशी घालून दिली? पाहुयात.
 
खुबाळकरांनी हरवलेल्या लोकांना देशभरातून शोधून आणलं
51 वर्षीय सुधीर खुबाळकर गेल्या 32 वर्षांपासून नागपूर पोलीसमध्ये नोकरी करतायत. आधी ते धंतोली पोलीस ठाणे, नंतर गणेशपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आता पूर्व नागपुरातील शांतीनगर पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. शांतीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे खुबाळकर यांच्यावर हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुठलीही मिसिंगची तक्रार आली की खुबाळकर लगेच शोधमोहिमेवर जातात.
 
खुबाळकर सांगतात, ‘’माझी बॅग भरून तयारच असते. हरवलेल्या व्यक्तीचं सायबर सेलकडून लोकेशन ट्रेस झालं आणि मला फोन आला की वेळेचं भान न ठेवता मिळेल त्या वाहनाने निघतो. कधी ट्रेनमध्ये उभ्यानं प्रवास करतो, तर कधी दोन सीटच्यामध्ये खाली झोपून प्रवास करतो. कधी जेवणही मिळत नाही.
 
"पण, त्या हरवलेल्या व्यक्तीजवळ लवकरच पोहोचता यावं यासाठीच माझी धडपड सुरू असते. मुलगी हरवली असेल तर तिला पोलिस ठाण्यात घेऊन येतो. त्यांचे आई-वडील मुलीला पाहून खुश होतात. माझेही आभार मानतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आनंद होतो. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू हीच माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे.’
 
हरवलेल्या मुलींना असं शोधलं
तक्रार आली की सुरुवातीला त्या व्यक्तीची माहिती घेतात. त्यांना कोणत्या सवयी आहेत? ते मंदिरात जातात का? कुठल्या एखाद्या ठिकाणाला वारंवार भेट देतात का? या सगळ्या गोष्टींची माहिती घेतात. त्यांच्याकडे मोबाईल फोन असेल तर सायबर सेलच्या मदतीने त्याचा सीडीआर काढतात. ती व्यक्ती जास्तवेळ कोणासोबत बोलत होती तो कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्याचं लोकेशन ट्रेस करतात आणि ते ठिकाण गाठतात. सोबत महिला कॉन्स्टेबल देखील असतात.
 
तिथे पोहोचल्यानंतर त्यांना विश्वासात घेतलं जातं. मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना समजावून सांगतात. त्यानंतर परत नागपूरला आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन करतात.खुबाळकर यांनी आतापर्यंत दिल्ली, अलाहाबाद, आग्रा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोल्हापूर, वर्धा, मनमाड अशा अनेक ठिकाणांवरून हरवलेल्या लोकांना परत आणून कुटुंबीयंच्या स्वाधीन केलं आहे.महत्त्वाचं म्हणजे खुबाळकर हे काम पोलिस गणवेशात न करता सिव्हील ड्रेसमध्ये करतात. जेणेकरून हरवलेल्या व्यक्तीला विश्वासात घेणं सहज शक्य होईल.हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यात खुबाळकर तरबेज आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांना एकाही प्रकरणात अपयश आलं नाही.
 
मनमाडवरून त्या मुलीला कसं परत आणलं?
खुबाळकर त्यांच्या शोहमोहिमेतला एक किस्सा सांगतात, ‘’नागपुरात राहणारी 19 वर्षीय निशा (बदललेलं नाव) नावाच्या मुलीच्या मिसिंगची तक्रार आली. लोकेशन ट्रेस केलं तर ती मनमाडच्या एका हॉटेलमध्ये होती.लोकेशन समजताच मी मनमाडसाठी ट्रेन पकडली. ती मनमाडला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथे गेलो तर मुलगी पसार झाली होती.
 
हॉटेलमधून माहिती मिळाली की तिच्यासोबत आणखी एक मुलग होता. हॉटेल परिसरातले सीसीटीव्ही तपासले तर ती तिच्या मित्रासोबत एका वाहनाने निघून गेली होती."आम्ही त्या वाहनाचा शोध घेतल तर ती शिर्डीला गेल्याचं समजलं. आम्ही शिर्डीला गेलो. पण, त्या वाहनचालकाला ती मुलगी आणि तिचा मित्र मनमाडच्या बाजारात दिसले. आम्ही मनमाड पोलिसांना फोन केला आणि शिपायाला तिथं पाठवलं. आम्ही पुन्हा 60 किमी परत मनमाडला आलो.

"निशाची समजूत काढली. दोघांनाही विश्वासात घेतलं आणि त्यांना नागपुरातल्या शांतीनगर पोलिस ठाण्यात आणलं.दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. पण, मुलाचं वय 21 वर्षांपेक्षा कमी होतं. त्यामुळे दोघांचीही समजूत काढली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवलं.’
 
सुट्टीच्या दिवशीही करतात काम
सुट्टी असली तरी खुबाळकर मिसिंगच्या तक्रारी आणि फोटो सोबत घेऊन फिरतात. असेच पत्नीसोबत देवदर्शनासाठी गेले असता त्यांनी लोकेश रंगारी यांचे 55 वर्षीय काका श्याम रंगारी यांना शोधून काढलं.
ते पत्नीसोबत टेकडी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तिथल्या उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती बसलेली दिसली.
"ही व्यक्ती आपल्या मिसिंग तक्रारीमधली असल्याचे लगेच लक्षात आलं. पोलिस ठाण्याला फोन करून टीम मागवली आणि मी तिथेच थांबलो.त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेलो आणि त्यांच्या कुटुंबाला सोपवलं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं" असं खुबाळकर सांगतात.
 
पण, ही 64 लोक कशी हरवली होती?
यापैकी काही वयस्कर लोकांना स्मृतीभ्रंश होता. त्यामुळे ते घराचा पत्ता विसरले. यातील काही पुरुष आणि महिला रागाच्या भरात घरातून निघून गेल्या होत्या.तर जास्तीत जास्त मुली इंस्टाग्राम, फेसबुकवरून ओळख झालेल्या मुलांसोबत पळून गेल्या होत्या.एक सीमा (बदललेलं नाव) नावाची मुलगी इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मुलासोबत उज्जैनला गेली होती. पण, खुबाळकरांनी तिचा एका दिवसांत शोध घेतला आणि घरातून पळून गेलेली मुलगी कुटुंबाला परत मिळाली.
 
मुलीने सोबत यायला नकार दिला तर काय?
घरातून निघून गेलेल्या मुलीनं परत यायला नकार दिला तर काय?
याबद्दल शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे सांगतात, "मुलगी सज्ञान असेल आणि ती आमच्यासोबत परत यायला तयार नसेल तर ती सुरक्षित आहे की नाही याचा तपास घेतो. तिला तिच्या घरी परत जायचं नसेल तर शासकीय गृहात ठेवतो.पण, आम्हाला अजून कुठल्याच हरवलेल्या मुलींकडून नकार मिळाला नाही. सगळ्या मुलींना सुखरूप त्यांच्या कुटुंबाजवळ पोहोचवण्याचं काम खुबाळकरांनी केलं.''
 
पुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सगणे हे हेडकॉन्स्टेबल खुबाळकर यांचंही कौतुक करतात.
ते म्हणतात, ''आम्ही पोलीस ठाण्यात प्रत्येक कामासाठी हेड नेमतो. मिसिंगच्या विभागाची जबाबदारी हेडकॉन्स्टेबल खुबाळकर यांच्यावर आहे. ते फार मेहनती आहेत.बंदोबस्त, पोलिस ठाण्यातलं काम सांभाळून हरवलेल्या लोकांना शोधण्याचंही कामही ते करतात. ते फक्त 10-12 तास नाहीतर कधी कधी 16-18 तास ड्युटी करतात. आम्ही पोलिस ठाण्यातून सगळी मदत पुरवतो.''
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती