पुणे- चिनाब मैत्रीपर्वाला सुरुवात; चिनाब खोऱ्याला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी सरहदचे प्रयत्न

शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:52 IST)
चिनाब खोऱ्याला महाराष्ट्राला जोडण्यासाठी सरहदने आणखी एक पाऊल टाकले आहे. या खोऱ्यात वॉर मेमोरियल, शाळा उभारणीसह विविध विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी नायब राज्यपालांबरोबर सरहदच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या सकारात्मक चर्चेतून पुणे- चिनाब मैत्रीपर्वाला सुरुवात झाली आहे.
 
काश्मीरमधील हिंसाचारग्रस्त भागांतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या पुण्यातील सरहद आणि अर्हम फाऊंडेशनने जम्मूला महाराष्ट्राबरोबर जोडण्यासाठी पाऊल टाकले आहे. निसर्ग सौंदर्यांची उधळण असलेल्या; परंतु दुर्लक्षित चिनाब खोऱ्यात शिक्षण, पर्यटन विकास आदी उद्दिष्टे या उपक्रमाअंतर्गत ठेवण्यात आली आहेत. सरहदचे संजय सोनवणी, अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शैलेश पगारिया, सरहदचे जम्मूतील संघटक तरुण उप्पल यांनी यासंदर्भात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन चर्चा केली.
 
चिनाब खोरे हा दहशतवाद्यांच्या कारवायांच्या झळा सोसलेला प्रदेश आहे. तेथील दोडा येथे वॉर मेमोरियलची उभारणी, तसेच चिनाब खोऱ्यातील दुर्लक्षित आणि अज्ञात सौंदर्य स्थळे जगासमोर आणणे, तेथील शेतीमालास महाराष्ट्रात बाजारपेठ उपलब्ध करून देत स्थानिक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत मिळवून देणे यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. या उपक्रमांसाठी सरकारी परवानगी व अन्य प्रक्रियांसाठी सहकार्य करण्याची विनंती या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती