संघावर बंदी घालू असे आम्ही म्हटलेले नाही : कमलनाथ

बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (15:35 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मध्यप्रदेशात बंदी घालू असे आम्ही कधीही म्हटलेले नाही आणि पक्षाच्या जाहींरनाम्यातही त्याचा उल्लेख नाही असा खुलासा मध्यप्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष कमलनाथ पुन्हा एकदा यांनी केला आहे. ते म्हणाले की या बाबत भाजपचे नेते आमच्याविषयी खोटा प्रचार करीत आहेत.
 
मध्यप्रदेशात सरकारी आस्थापनांमध्ये संघाच्या शाखा भरवण्यास परवानगी दिली गेली आहे.त्याला आमचा विरोध आहे. तथापी या विषयी केंद्र सरकारचे जे नियम आहेत तेच राज्य सरकारलाही लागू व्हायला हवेत. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये संघाच्या शाखा भरवण्यास अनुमती नाही. भाजपच्या मधल्या काळातील दोन मुख्यमंत्र्यांनी या विषयी नियमात जे बदल केले आहेत त्याला आमचा विरोध आहे. उमा भारती आणि बाबुलाल गौड मुख्यमंत्री असताना मध्यप्रदेशात या विषयी जी स्थिती होती तशीच स्थिती कायम राहीली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
 
संपुर्ण राज्यात संघावर बंदी घालावी असे आम्ही कधीही म्हटलेले नाही असे त्यांनी आज येथे पीटीआयशी बोलताना सांगितले. राज्यातील निवडणुकीच्या स्थिती विषयी बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पोटतिडकीने प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसला सत्ता मिळवून देण्याची भूक त्यांच्यात आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती