तर पाकिस्तानच जन्मालाच आला नसता : उद्धव ठाकरे

बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:33 IST)
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानच जन्मालाच आला नसता, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी केली. ‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कार्य नाकारत नाही. देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी १४ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते १४ मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच राहुल गांधी यांना पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असा टोमणाही त्यांनी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती