आसाममध्ये मुसळधार पावसामुळे आता पूराचं संकट

गुरूवार, 25 जून 2020 (13:21 IST)
कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पूराचं संकट आलं आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती झाली आहे. आसाममधील पुरामुळे हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आतापर्यंत ३८,००० लोकांना याचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन अहवालानुसार राज्यातील पूरात मृत्यू झालेल्यांपैकी एकूण मृतांची संख्या १२ झाली आहे.
 
दिब्रुगडमधील सीआरपीएफ मुख्यालयातही पुराचं पाणी शिरलं आहे, त्यामुळे सैनिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सैनिकांच्या खोल्यांमध्ये पाणी शिरलं आहे.
 
आसामच्या वेगवेगळ्या भागात संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गुवाहाटीतील ब्रह्मपुत्र नदीचे पाणी धोक्याच्या पातळीच्या फक्त एक मीटर खाली आहे. मात्र, नदीची पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी साजिदुल हक म्हणाले, “ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपासून १ मीटर खाली आहे.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती