आईचा सन्मानाचा दिवस म्हणजे मातृदिन

शुक्रवार, 8 मे 2020 (15:25 IST)
मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ दिन होय. पण मला असा प्रश्न पडतो की खरंच का आपणं आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? 
 
आई दैवत आहे. आई बद्दल काहीही लिहिणे अशक्य आहे. रात्रंदिवस एक करून ती आपले संगोपन करते.आईला प्रथम गुरु मानले गेले आहे. आपली संस्कृती आईच माझा गुरु, आईच कल्पतरू अशी शिकवण देते. खरं तर प्रत्येक दिवसच आईचा असतो. एकही दिवस सरत नाही की आपले आईवाचून काही अडले नाही. असे म्हटले गेले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे तंतोतंत खरे आहे. ज्याच्यांकडे आई नावाचे दैवत नाही मग तो राजा असो किंवा रंक त्याची अवस्था भिकारी प्रमाणेच आहे. 
 
आई वंदनीय आहे, पूजनीय आहे. आई आहे तर सर्व सुख आहे. आईला मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला हवा? ती तर दररोज सन्माननीय आहे. तिच्या या कष्टाला आमचा मानाचा मुजरा.
 
मातृदिन संपूर्ण विश्वात साजरे केले जाते. पाश्चिमात्यांच्या देशात आईचे आभार मानण्याची पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे, अश्या पद्धतीने हा दिन अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात मातृदिन म्हणून साजरा केला जातो. 
 
मातृ दिन साजरे करण्याची पद्धत आली तरी कुठून? 
अमेरिकेतील 28 व्या राष्ट्राध्यक्ष थॉमस वूडरॉ विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार अधिकृतपणे मातृदिन म्हणून जाहीर केला. या दिवशी आपला संपूर्ण दिवस आपल्या आई सोबत घालविण्याचे जाहीर केले. या साठी सार्वजनिक सुट्टी देखील देण्यात आली. सुरुवातीस हे फक्त अमेरिकेपुरतीच जाहीर केले होते. 
 
ते फक्त अमेरिकेसाठीचं मर्यादित होते. पण नंतर हे संपूर्ण जगात साजरे करू लागले. परंतु जगातील बऱ्याच भागांमध्ये हा दिवस मार्च किंवा मे महिन्यात साजरा होतो. बल्गेरिया आणि रोमानिया मध्ये जागतिक महिलादिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या आईला आजीला काही भेट वस्तू देतात आणि त्यांचा बद्दलची आपली कृतज्ञता आणि आपले प्रेम व्यक्त करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती