आई

रविवार, 10 मे 2020 (12:27 IST)
माझी जन्मदात्री माझी माय माझी आई
माझी पहिली मैत्रीण माझा पहिला जिव्हाळा
माझा पहिला लळा
माझी आई
 
जे सगळे करतात तेच तिनेही केलं
पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ना
तशी तिचीही एक खास होती
चांगल्या वाईटाची तिला असलेली जाण
तिने लहानपणापासूनच मनात रुजविली
काळाची गरज ओळखून स्वतःच्या पायावर
उभे राहायला तिनेच तर प्रोत्साहन दिले
प्रसंगी रागे भरली प्रसंगी लाड केले
प्राप्त परिस्थीतीत आनंद मानायला शिकवले
तसेच प्राप्त परिस्थिती पालाटण्याचे बाळकडूही
तिनेच पाजले 
 
जन्म तर दिलाच पण दाणापाणी
देतानाच पंखातही उंचच उंच उडण्याचे
भरारी घेण्याचे बळ दिले चांगुलपणा, मेहेनत
यातील यश आणि खऱ्याची ताकत
ओळखण्याची कुवत
सन्मार्गावर चालण्याची बुद्धी बुद्धीच्या बळावर जग
जिंकता येतं हा विश्वास हे सगळं देणारी
माझी आई
 
जगावेगळी नाही म्हणणार मी
पण एक खास व्यक्तिमत्व आहे
जिला अजूनही माझ्या आनंदात
माझ्या प्रगतीत मनापासून आनंद होतो
अजूनही मी खूप पुढे जावे
प्रामाणिक प्रयत्नांनी नेहेमीच यश मिळवावे
हीच तिची आत्यंतिक इच्छा असते
आमचे मतभेद हो.. होतात ना
पण ते विषयाची खोली समजून घेण्यासाठी
विषयाचा,परिस्थितीचा आढावा घेताना...
त्यातही उमेद असते जिज्ञासा असते
एकमेकींची विषयाला समजून घेण्याची
गरज आणि इच्छा असते 
 
तेव्हाच प्रेम मात्र 
निरपेक्ष आणि निखळ करावं ते आईनेच
हात देण्यासाठी कायम तयार असतात
फक्त मी यशच मिळवावे आणि कुठे कमी नसावे
या तिच्या आशावादाला आणि 
प्रबळ इच्छाशक्तीला माझे नमन
अशी आई 
 
मी किती होऊ शकेन यात मला यश मिळेल 
की नाही या मापदंडात मी कितपत उतरेन
कुणास ठाऊक पण मोजक्या साधनात
आणि उचित प्रयत्नात आयुष्यात समाधान
आणि यश नक्की मिळते 
प्रयत्न महत्त्वाचा हे मात्र तिनेच शिकवले
जे आजही मला मार्ग दाखवते
आणि प्रत्येक पिढीने अंगी बाणवावे असे
हे नियम, आयाम मला घालून देणारी
माझ्या कलागुणांना नेहेमीच वाव मिळेल 
हे पाहणारी
माझी आई 
 
माझी गुरु माझी प्रिय सखी
अशी माझी आई आणि तिची महती
आणि तिच्या न फिटणाऱ्या 
ऋणाची कहाणी
- माधवी कुऱ्हेकर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती