जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

शुक्रवार, 8 मार्च 2019 (11:35 IST)
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम सुरू असताना अवघ्या 34व्या वयात कॅन्सरशी गाठ पडलेल्या वैशाली चौगुले यांनी सहा वर्षे कॅन्सरशी लढा दिला. सहा वर्षांतील तीन वर्षे वैशालीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या कालावधीत त्यांच्यावर 11 किमोथेरपी करण्यात आल्या तर 45 रेडिएशनद्वारे उपचार करण्यात आले. कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांनी मनोमनी आता आपले संपले असे ठरवून टाकले होते. पण, दोन मुली व ऐक मुलाकडे पाहिले आणि त्यांच्यासांठी जगायचेच, आता हतबल व्हायचे नाही तर कॅन्सरवर मात करायची याचा निर्धार केला. या लढ्यात पती व मुलांनी साथ दिली त्यामुळे कठीण कालावधीला धैर्याने तोंड देऊ शकल्याची भावना वैशाली चौगुले यांनी व्यक्त केल्या. उपचार संपल्यानंतर घरी आलेल्या वैशाली यांनी घरात बसून न राहता काही तरी करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगली. त्यामुळे प्रथम घरातच ड्रेस मटेरियल, साडी वगैरे साहित्याने दुकान सुरू केले. त्यातून मिळत गेलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आता दुकानगाळा घेऊन शॉप सुरू केले. वैशाली यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून डॉक्टर अनेक रुग्णांना समुपदेशनासाठी त्यांच्याकडे पाठवतात. कॅन्सरवर मात करता येते हे त्या रुग्णांना सांगून आत्मविश्वास निर्माण करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती