सोन्याची पिसे आणि लोभी बाई

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (17:11 IST)
एकदा एका गावात एक लहानशे तळ होते. त्या तळ्यामध्ये एक हंसीण राहायची. त्या हंसिणीचे पीस सोन्याचे होते. त्या तळाच्या जवळच एक बाई आपल्या दोन मुलींना घेऊन राहायची. ती बाई फार गरीब होती. तिचे आयुष्य फार कष्टाने चालले होते. 
 
एके दिवशी ती हंसिणी विचार करते की जर आपण या आपल्या पिसांमधून काही पीस त्या बाईला दिले तर त्या बाईचे सर्व कष्ट दूर होतील. असा विचार करून ती हंसिणी त्या बाईच्या झोपडीत जाते आणि तिला मदत करण्याचं सांगते. त्यानंतर ती हंसिणी त्या बाईची दररोज एक एक सोनेरी पीस देऊन मदत करायची. हंसिणीने अशा प्रकारे मदत करून त्या बाईचे सर्व दुःख दूर केले. आता ती बाई आणि तिच्या मुली आनंदाने राहू लागल्या. 
 
बघता-बघता काळ सरला आता ती बाई फार श्रीमंत झाली. एके दिवशी त्या बाईच्या मनात लोभ आला. तिने विचार केला की जर आपण त्या हंसिणीचे सर्व पिसे काढले तर आपण अजून श्रीमंत बनू. असा विचार करून ती बाई दुसऱ्या दिवशी त्या हंसिणीला पकडते आणि तिचे सर्व पिसे ओढू लागते. ती बघते तर काय, त्या हंसिणीचे ते सोनेरी पिसे आपला रंग बदलतात आणि सामान्य होऊन जातात. ते बघून त्या बाईला आश्चर्याचा धक्का बसला. हंसिणीने तिला बघितले आणि म्हणाली की मी तुला मदत करायची ठरवली आणि तशी केली देखील. पण आता तुझ्या मनात लोभ आला आहे, त्यामुळे आता मी तुझी काहीच मदत करणार नाही. मी इथून जात आहे कधीही परत न येण्यासाठी. असे म्हणून ती हंसिणी उडून जाते. 
 
त्या बाईला आपल्या केलेल्या चुकीची जाणीव होते पण आता पश्चाताप करून काय होणार, हंसिणी निघून जाते कायमची. पुन्हा कधीही न येण्यासाठी. त्या बाईने अति लोभ केला म्हणून तिला आपले सर्व काही गमवावे लागले.
 
तात्पर्य - अति लोभ करणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती