झोपेत घोरण्यामुळे कुटुंबावर काय परिणाम होतो? तुमच्या घरात ही समस्या असेल तर नक्की वाचा

गुरूवार, 14 मार्च 2024 (18:53 IST)
मी मोठ्यानं घोरण्यावरून कुटुंबीय आणि मित्रांसमोर माझ्या पतीची चेष्टा करायचे किंवा त्यावर जोक करायचे. पण याचा आमच्या नात्यावर कुठंतरी गंभीर परिणामही होत होता," सिंगापूरमधील 45 वर्षीय विवाहित महिला अरुनिका सेलव्हम यांनी सांगितलं.
 
"मी याबाबत पतीबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, तर तो त्यामुळं नाराज होईल, याची मला काळजी वाटत होती."
पतीचं घोरणं हे 'लग्नाच्या पॅकेज'सोबतच येणारा भाग असतो, असा विचार त्यांनी केला. पण तरीही पतीबरोबरच्या त्यांच्या नात्यावर याचा परिणाम होतच होता.
 
"तिचं पतीच्या घोरण्यामुळं रात्रीचं जागरण वाढलं आणि त्याचा परिणाम म्हणजे सकाळच्या वेळी तिची चिडचिड व्हायला लागली," असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.पतीच्या घोरण्यामुळं त्यांना रात्रीची चांगली विश्रांती मिळणं बंद झालं. परिणामी झोप पुरेशी होत नसल्यानं त्याचा त्यांच्या कामावरही परिणाम झाला.
खरं म्हणजे जोडीदाराच्या घोरण्याकडं दुर्लक्ष करणं ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. पण आरोग्य आणि नातेसंबंध तज्ज्ञांच्या मते, याचा जोडीदाराशी असलेल्या नात्यांवर आणि त्याचबरोबर आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
 
स्लिप ॲप्निया म्हणजे काय?
मोठ्या आवाजात घोरण्याचा संबंध हा झोपेच्या विकाराशी जोडला जातो. या विकाराला ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया (OSA)असंही म्हटलं जातं. यामध्ये झोपेदरम्यान वारंवार श्वासोच्छ्वास थांबतो आणि सुरू होत असतो.
 
घशाच्या भिंती अरुंद झाल्यामुळं हा विकार उद्भवत असतो. त्यामुळं सामान्य श्वासोच्छ्वासात अडथळा येतो आणि परिणामी ऑक्सिजनचं डिसॅच्युरेशन होतं.
यावर उपचार केले नाही तर घोरणारी व्यक्ती आणि पार्टनर या दोघांच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसंच त्यांच्या कामेच्छेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
स्लिप ॲप्नियाची लक्षणे काय?
याची लक्षणं प्रामुख्यानं झोपेमध्ये पाहायला मिळतात. ती पुढीलप्रमाणे असतात:
मोठ्याने घोरणे
श्वासोच्छ्वास थांबणे आणि पुन्हा सुरू होणे
घोरण्याचा, गुदमरण्याचा किंवा गळा दबल्याचे आवाज
वारंवार जाग येणे
दिवसाही याचे काही परिणाम दिसू शकतात:
जागे असताना डोकेदुखी होणे
सातत्याने थकवा जाणवणे
एकाग्रता टिकवणे कठिण जाणे
स्मरणशक्ती कमी होणे
नैराश्य, चिडचिड किंवा मूडमधील इतर बदल जाणवणे
समन्वयात अभाव जाणवणे
सेक्स ड्राइव्ह कमी होणे
आरोग्याच्या इतर समस्या
याशिवाय ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्नियामुळे आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात.
 
ॲप्नियामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानकपणे कमी झाल्यामुळं रक्तदाबात वाढ होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ज्ञ देतात. त्यामुळं याच्याशी संबंधित इतर अनेक आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात, असंही तज्ज्ञांचं मत आहे.
काही अभ्यासांनुसार OSA मुळं हृदय बंद पडण्याचं प्रमाण जवळपास 140% टक्क्यांनी वाढू शकते. तसंच स्ट्रोकची शक्यता 60%, आणि हृदयरोगांचं प्रमाण 30 % नी वाढण्याची शक्यता असते.
 
काही स्लिप थेरपिस्टच्या मते, स्लिप ॲप्नियाचा कामेच्छेवरही परिणाम होऊ शकतो.काही लोकांना त्यांच्या जोडीदाराचं घोरणं हे गंमतीशीर वाटत असतं. पण याचा त्यांच्या नात्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते, असं डॉ. सत्यमूर्ती म्हणाले.
 
"मी भेटत असलेल्या 90% रुग्णांना रेफरल सुरू करण्यात आलं आहे. कारण याचा जोडीदारावर मोठा परिणाम होत असतो," असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.त्यामुळं शेवटी जोडीदार वेगळ्या खोलीमध्ये झोपू लागतात. या प्रकाराला स्लिप डिव्होर्स म्हणूनही ओळखलं जातं.
पण अमेरिकेतील नातेसंबंध तज्ज्ञ सारा नासेरजादेह यांना मात्र, घोरण्याचा मुद्दा असला किंवा नसला तरीही जोडीदारानं वेगळं झोपण्यात काही वेगळं वाटत नाहीत.
 
"रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर दिवसाची सुरुवात केल्यास अधिक चांगलं नातं निर्माण होऊ शकतं", असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या. पण जर अतिरिक्त बेडरूम असेल तरच हे शक्य आहे.काही जोडप्यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, स्लिप डिव्होर्स हा कायमच्या विभक्त होण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल ठरू शकतं.
 
नेमका मुद्दा काय?
अरुणिका सेलव्हम या सिंगापूरमध्ये राहतात. जगातील सर्वाधिक जीडीपी असलेल्या देशांच्या यादीत याचा समावेश आहे. पण तरीही त्यांच्यासाठी घरात झोपण्यासाठी वेगळा बेड मिळणं कठीण आहे.त्यांच्या लग्नाला 15 वर्षं झाली असून एक अपत्यही आहे. "आम्हाला या सिंगापूरमध्ये राहण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च भागवण्यासाठी आमची गेस्ट रूम भाड्यानं द्यावी लागली आहे," असं त्या म्हणाल्या.
 
पण तरीही अनेक रात्री घोरण्याचा त्रास सहन करून झोपेचं खोबरं झाल्यानंतर अरुणिका यांनी या समस्येबद्दल त्यांच्या पतीशी चर्चा केली.पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची त्यांची तयारी नव्हती. कारण त्यांचे वडील आणि आजोबा दोघंही घोरत होते आणि त्यात काहीही गैर नाही असं त्यांचं मत होतं.
 
पुरुषांनी मोठ्यानं घोरणं याकडं पुरुषत्वाची एक खूण म्हणूनही पाहिलं जातं. विशेषतः आशियातील काही संस्कृतींमध्ये तसं मानलं जातं, असं सेलव्हम म्हणाल्या.
घोरण्यामुळं अपूर्ण राहणाऱ्या झोपेच्या समस्येमुळं अनावश्यक वाद मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात.
सारा नासेरजादेह यांच्या मते, "अशा परिस्थितीत हा मुद्दा योग्य प्रकारे पार्टनरसमोर मांडण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहायला हवी. तसंच अत्यंत शांतपणे, हळुवारपणे हा मुद्दा मांडावा", असंही त्या म्हणाल्या.
 
"कदाचित सेक्सनंतर किंवा चांगला मूड असेल त्यानंतर किंवा चांगल्या चर्चेनंतर, तुम्ही हे करू शकता" असं नासेरजादेह म्हणाल्या.
नासेरजादेह यांनी लव्ह बाय डिझाइन- '6 इनग्रिडेंट्स टू बिल्ड लाइफटाईम ऑफ लव्ह' हे पुस्तकही लिहिलं आहे. सामाजिक मानसशास्त्रातील त्या तज्ज्ञ आहेत."घोरणाऱ्या व्यक्तीला अनेकदा त्यांच्या या समस्येबद्दल प्रचंड लाजही वाटत असते" हेही लेक्षात ठेवायला हवं, असं त्यांनी म्हटलं.
 
गंभीर परिणाम
ब्रिटिश 'स्नोरिंग अँड स्लिप ॲप्निया असोसिएशन'च्या मते युकेमध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त लोक घोरण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. तर याचा परिणाम 3 कोटी लोकांवर होत आहे.एका ताज्या सर्वेक्षणानुसार घोरणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण हे महिलांच्या प्रमाणाच्या तुलनेत खूप जास्त आहे, असं या असोसिएशननं म्हटलं.पण कोण जास्त घोरतं? याचा विचार न करता या सवयीचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
 
काही अहवालांनुसार घोरणं हे अमेरिका आणि इंग्लंडमधील घटस्फोटांच्या मागे असलेल्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. पण हा दावा सिद्ध करण्यासाठी काहीही ठोस अद्याप समोर आलेलं नाही.
घोरण्यामुळं नात्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात
युकेमधील वकील रीटा गुप्ता यांनी देखील त्यांच्या फर्मकडे घोरण्याच्या समस्येमुळं घटस्फोटाची अनेक प्रकरणं आली असल्याचं सांगितलं."लग्नाच्या नात्यात आनंदी नसण्याचं एक मुख्य कारण म्हणून हा मुद्दा समोर आला," असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.
 
"मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की, ते घोरण्याच्या या समस्येमुळं अनेक वर्ष वेगळ्या खोलीमध्ये झोपले. त्यानंतर ते वेगळे झाले," असंही त्यांनी सांगितलं.
या मुद्द्यामुळं होणाऱ्या घटस्फोटांच्या मुद्द्यातील समान बाब म्हणजे, वैद्यकीय उपचारांकडं दुर्लक्ष करणं आणि आवश्यक ती पावलं न उचलणं ही आहे. त्यामुळं यात वचनबद्धतेचा अभाव दिसतो, असंही त्या म्हणाल्या.
 
"उदाहरणार्थ एका पुरुषाविरोधातील खटल्यात एक महिला म्हणत होत्या की, 'ते खूप जोराने घोरतात. त्याचा माझ्या झोपेवर प्रचंड परिणाम झाला आहे. त्यासाठी ते काहीही पावलंही उचलत नाहीत.'"
घोरणे किंवा स्लिप ॲप्नियासाठी काय करू शकता?
स्लिप ॲप्नियाच्या उपचारांमध्ये दैनंदिन जीवनशैलीतील बदलांचा समावेश असू शकतो:
 
वजन कमी करणे
धूम्रपान सोडणे
अल्कोहोलचं प्रमाण कमी करणे
तर अनेक व्यक्तींसाठी CPAP (कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन नावाच्या उपकरणाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे.हे उपकरण तुम्ही झोपताना चेहऱ्यावर किंवा नाकावर जे मास्क वापरता त्यात हळूवारपणे हवा सोडत असतं.अशाप्रकारे CPAP मशीन झोपताना येणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या समस्येत मदत करते.
 
डॉ. राममूर्ती सत्यमूर्ती म्हणाले की, घोरणारी व्यक्ती आणि त्याची जोडीदार या दोघांच्या आरोग्याचा विचार प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं त्यांना वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं.
"याचा केवळ नातेसंबंधांसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. कारण यामुळं आरोग्याच्या ज्या इतर समस्या उद्भवतात त्यावरील औषधोपचाराचा खर्चही वाचू शकतो. त्यामुळं हे संपूर्ण कुटुंबासाठीच फायद्याचं ठरू शकतं," असं ते म्हणाले.
 
आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे
घोरण्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा जागतिक आणि वैयक्तिक पातळीवर वेगळा असू शकतो. पण त्यावर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींचा प्रभाव असू शकतो. तसंच लिंग आणि लैंगिकता याचाही प्रभाव असू शकतो.श्रीलंकेच्या कोलंबोतील समन (नाव बदलेलं) या 40 वर्षीय गे व्यक्तीनं कुटुंबीयांपासून ते गे असल्याची ओळख लपवून ठेवली आहे. समनला खोली भाड्यानं देणारी व्यक्ती म्हणजे त्यांचा प्रियकर हा फक्त त्यांचा मित्र आहे, असं कुटुंबीयांना वाटतं."माझा पार्टनर मोठ्यानं घोरतो आणि त्याच्या घोरण्यामुळं मला झोप येत नाही. माझी आई मला भेटायला येते, तेव्हाच मला चांगली झोप येते," असं समन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
"आई येते तेव्हा माझा पार्टनर माझ्या आईला एक वेगळी खोली देतो. तिला असं वाटतं की ती त्याची रूम आहे. त्यावेळी तो सोफ्यावर झोपतो," असं ते म्हणाले.
 
"फक्त त्या वेळीच मला चांगली झोप मिळते."
"माझा प्रियकर स्वतःला स्त्रियांसारखे काही गुण असलेला समलिंगी पुरुष समजतो. पण आपल्या समाजात घोरण्याला पुरुषत्वाचं प्रतीक समजलं जातं. मला वाटतं की, या मुद्द्यावर चर्चा केली तर त्याला वाईट वाटेल आणि तो मला सोडून जाईल," असं ते म्हणाले.पार्टनरबरोबर या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी समन सध्या धाडस एकटवत आहे.पण त्याचवेळी सेलव्हम यांनी त्यांच्या पतीला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी राजी केलं. त्यातून त्यांना ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया असल्याचं समोर आलं.आता माझे पती हा मुद्दा स्वतः हाताळत असून वजन कमी करण्यासाठी त्यांनी व्यायमही सुरू केला आहे, असं सेलव्हम म्हणाल्या.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती