१ मार्चला प्रेक्षकांना लागणार 'डोक्याला शॉट'

गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (14:13 IST)
रितेश देशमुख आणि कैलास खेर यांच्या हस्ते ट्रेलर आणि म्युझिक लाँच.
 
अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात ट्रेलर सोबत 'डोक्याला शॉट' चित्रपटाच्या संगीताचेही कैलास खेर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
नावाप्रमाणे अगदी हटके घटना चार मित्रांच्या आयुष्यात घडते आणि चालू होतो 'डोक्याला शॉट'. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला' डोक्याला शॉट' हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण असे एक 'पॅकेज' असणार आहे. अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे 'डोक्याला शॉट'. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाले की," मी हा चित्रपट पहिला आणि पाहताना माझे फक्त खुर्चीतून खाली पडायचे बाकी होते. इतका मी हसत होतो. खूप सुंदर चित्रपट आहे. आणि मैत्रीवर आधारित आहे. आपण आयुष्यात एकच गोष्ट खरी कमावतो आणि ती म्हणजे 'मैत्री'. आपली खरी मैत्री आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. त्यामुळे अशा या वेगळ्या तरीही जिव्हाळ्याच्या विषयावर असलेला हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. मी शाश्वती देतो, की तुमची चित्रपटगृहातून बाहेर पडताना नक्कीच निराशा होणार नाही."
 
कैलास खेर हे देखील या सोहळयाला आवर्जून हजर होते. कैलाशजींनी या चित्रपटात एक गाणे देखील गायले आहे. त्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, "मला तर 'डोक्याला शॉट' या शब्दाचा सुरुवातीला अर्थही माहित नव्हता तरी मी या सिनेमात गाणं गाण्यास होकार दिला, कारण या चित्रपटाची कथा मला आवडली, त्यानिमित्ताने मला पुन्हा मराठीत काम करण्याची संधी मिळत होती आणि ही संधी मला गमवायची नसल्याने मी होकार दिला". 
 
'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. उत्तुंग ठाकूर यांनी या आधी 'बालक पालक', 'येल्लो' यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती केली आहे. कमी वयात उत्तम कथेची जाण असलेल्या, नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तुंग ठाकूर यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्तम दिग्दर्शक लाभणार आहे.  'न्यूड', 'बालक पालक', 'रेगे', 'येल्लो' अशा विविध विषयांवर आधारित अप्रतिम चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शिवकुमार पार्थसारथी हे 'डोक्याला शॉट' चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. याशिवाय गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे. त्यांच्या सुंदर शब्दांना अमितराज, श्रीकांत-अनिता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मिका सिंग, कैलास खेर या दिगज्ज गायकांनी त्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. या लाँच सोहळ्यासाठी 'डोक्याला शॉट' चित्रपटाचे निर्माता उत्तुंग ठाकूर, दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांच्यासह राधिका क्षीरसागर, समीर पाटील, दिग्दर्शक अभिजित पानसे, संगीतकार अमितराज आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती