सोन्याची खरेदी करताय, आजपासून लागू होतोय ‘हा’ नवा नियम

मंगळवार, 15 जून 2021 (15:11 IST)
येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल. 
 
हॉलमार्किंग केंद्रांची संख्या वाढवल्याचा सरकारचा दावा गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य आहे. भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. यापैकी केवळ 35,879 आस्थापने BIS सर्टिफाइड आहेत. 
 
या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.
 
हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?
सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.
 
BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.
 
भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती