मराठा आरक्षणासाठी सरकार जे जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (09:33 IST)
आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी चर्चा केली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली.    
 
माध्यमांना माहिती देताना फडणवीस म्हणाले, आम्ही विरोधी पक्षाच्यावतीने भूमिका मांडताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे, ते बहाल करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. आम्ही यामध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही. सरकार कुठं चुकत असेल तर जरुर सरकारला सांगू. परंतु सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ. तात्काळ या संदर्भातील कायदेशीर निर्णय केले पाहिजे. समजा जर सरकारचं मत आहे की, घटनापीठाकडेच गेलं पाहिजे. तर त्याही संदर्भात तात्काळ अर्ज करून, घटनापीठ स्थापित करून, त्या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे, की आता तुम्ही स्थगिती हटवा. नंतर मग इतर आरक्षणाच्या ज्या याचिका आहेत, त्या सोबत अंतिम सुनावणी करा. तशाप्रकारे साधरणपणे सरकारने त्या ठिकाणी भूमिका ठेवलेली आहे.
 
यासोबतच आम्ही एक दुसरी गोष्टं प्रकर्षाने मांडली. ती म्हणजे, आता मराठा समाजातील तरुणाईसमोर खूप मोठ्याप्रमाणावर संकट उभा ठाकलं आहे. आव्हानं उभी झाली आहेत आणि एक भीतीचं वातावरण आहे. अशावेळी सरकराने या संदर्भात देखील त्यांना आश्वास्तं केलं पाहिजे. एकीकडे आरक्षण कसं बहाल करता येईल, यासाठी प्रयत्न करत असताना, हा जो काही मधला काळ आहे, या काळात मराठा समाजातील तरुणांना प्रवेश मिळाले पाहिजेत. यासाठी आपल्या ज्या संस्था आहेत, यातील जागा वाढवून त्यांचे समायोजन करता येईल का हा प्रयत्न केला पाहिजे, असं देखील त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती