अहमदनगर लोकसभा : निलेश लंके भाजपाचं गणित बिघडवणार? सुजय विखे विरुद्ध सर्व अशा लढ्याची चर्चा

शनिवार, 16 मार्च 2024 (12:30 IST)
अहमदनगर हे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेचा महत्त्वाचा मतदारसंघ अशी दुहेरी ओळख असलेला मतदारसंघ आहे. शिवाय प्रचंड राजकीय हालचालींचं ते केंद्र आहे.
लोकसभेचा विचार करता अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभागला गेला आहे. दक्षिण आणि उत्तर असे याचे विभाग आहेत. यात दक्षिण हा अहमदनगर म्हणून तर उत्तर मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे कायमच या मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळत असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इथं चांगलाच राजकीय धुरळा उडणार हे स्पष्ट झालं आहे.
भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांचं नाव अंतिम समजलं जात आहे. ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे .
 
एकूणच अहमदनगरमध्ये या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे.
अहमदनगरमधील राजकीय समीकरणं पाहता थोरात, जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळं यावेळी विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीतील फूट, भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाच्या चर्चा या सर्वांचा विचार करता अहमदनगरचा काँग्रेसकडून हिसकावलेला हा किल्ला राखण्यासाठी भाजपचा चांगलंच झगडावं लागणार हे नक्की आहे.
त्याचवेळी महाविकास आघाडीलाही आव्हानाचा सामना करवा लागणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांना पक्षातील फुटीचा सामना करावा लागू शकतो.
 
अहमदनगर मतदारसंघाचा इतिहास कसा राहिलाय?
अहमदनगरचं नाव काढलं की गडाख, विखे, थोरात, जगताप अशा घराण्यांची नावं आणि राजकारण डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. या नावांच्या भोवतीच या मतदारसंघाचा इतिहास मोठ्या प्रमाणात फिरत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
1952 पासून ते 1996 पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इतर कोणत्याही पक्षाला याठिकाणी अस्तित्व निर्माण करण्यात फारसं यश आलं नाही. यशवंतराव गडाख याठिकाणी सलग तीन वेळा खासदार राहिले. पण 1998 मध्ये युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यानंतर भाजकडून दिलीप गांधींनीही तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभा निहाय विचार करता याठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 भाजपचे आमदार आहेत.
 
अनेक घराण्यांचं राजकीय वजन पाहता या मतदारसंघामध्ये घराणेशाही आणि त्यातून होणारे पाय खेचण्याचे प्रकार यामुळं कायम वेगळी आणि धक्कादायक समीकरणं पाहायला मिळाली आहेत.
त्यांचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोच, पण जिल्ह्यालाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळतं. विठ्ठलराव विखे पाटील त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे आणि आता सुजय विखे अशा चार पिढ्यांनी या मतदारसंघाच वर्चस्व राखलं आहे. पण आता विखेंच्या वर्चस्वाच्या विरोधात त्यांचे सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांना नामोहरम करणार का हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.
 
2019 मध्ये भाजपने भाकरी फिरवली
नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर 2019 च्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनं अनेक मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवली होती. त्यापैकी एक मतदारसंघ होता अहमदनगर.
अहमदनगरमधून 2009 आणि 2014 मध्ये सलग दोन वेळा भाजपचेच दिलीप गांधी विजयी झाले होते. त्याच्या आधी 1999 मध्येही गांधी खासदार बनले होते. पण 2019 मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली.
 
भाजपनं 2019 मध्ये उमेदवार बदलत काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना याठिकाणची उमेदवारी दिली. मतदारसंघात विखेंच्या वर्चस्वाचा त्यांना फायदा झाला. त्यामुळं संग्राम जगताप यांचं अव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखांच्या मताधिक्यानं विजय मिळवला.
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी असली तरी विखेंच्या कुटुंबातील उमेदवारामुळं अनेक मतं त्यांच्या बाजुनं वळली आणि त्यामुळं भाजपला साहजिकच फायदा झाला. गांधींच्या सतत 10 वर्षांच्या खासदारकीच्या विरोधातील नाराजीमुळं होणारं नुकसान टाळण्यात त्यामुळं भाजपला यश आलं.
 
चार वर्षांत काय घडलं?
2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात जे काही घडलं त्याचा परिणाम नक्कीत राज्याप्रमाणेच अहमनगरमध्येही होणार हे जवळपास स्पष्टच आहे. पण अहमदनगरमध्येही बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या आहेत.
लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार ठिकाणि राष्ट्रवादी आणि दोन ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झाले.
विशेष म्हणजे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही राजकारणात प्रवेश करण्यासाठी अहमदनगरचा मार्ग निवडला. त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपच्या राम शिंदेंना पराभूत केलं. या लढतीची प्रचंड चर्चा झाली.
त्यानंतरही अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अपक्ष लढून काँग्रेसशी बंडखोरी केली. त्यामुळं थोरातांचं वर्चस्व या मतदारसंघामध्येही काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश गेला.
 
त्याचवेळी भाजपमध्येही डॉ. सुजय विखे विरुद्ध राम शिंदे अशा संघर्षाच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे. राम शिंदे यांनी तर खासदारकी लढण्याची तयारी केल्याच्याही चर्चा होत्या. पण तसं झालं नाही.
 
नीलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा हा सामना होणार हे असं सध्या दिसत असलं, तरी लंकेंनी मात्र त्याची तयारी आधीच सुरू केली होती याचे संकेत मिळतात.
 
त्याचं कारण म्हणजे नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली होती. त्या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
 
गटातटाच्या राजकारणाचा धोका
मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ अशी ओळख या मतदारसंघाची आहे. पण त्याचवेळी एकिकडं सधन जिल्हा अशी ओळख आणि त्याचवेळी काही भागात पाण्याचं संकट असंही चित्र या मतदारसंघात पाहायला मिळतं.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाची भूमिका ही नक्कीच या मतदारसंघातील निर्णायक मुद्दा ठरू शकते. इतर मतदारसंघांप्रमाणेच काही पायाभूत सुविधांचे मुद्देही आहेत.
पण या सर्वाच्याही पुढं जात गटातटाचं राजकारण याचाच सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
 
भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच निलेश लंके आता शरद पवार गटात गेल्यानं त्यांना अधिक शक्ती मिळाली आहे.
विखेंचे त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्वच विरोधक या निवडणुकीच्या निमत्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात असल्याची चर्चा आहे.
पण विखेंनीही त्यासाठी तयारी सुरू केली असून थेट जनसंपर्कातून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केलीय.
सामान्य मतदारांचा विचार करता, गेल्या काही वर्षातील राज्याच्या फुटीच्या राजकारणावरही लोक मतं मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळं त्याबाबत मतदार सगळ्याच गोष्टींवर कसा विचार करतात आणि त्याचा मतांवर कसा परिणाम होतो, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती