चैत्यभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी, प्रशासन सज्ज

गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (10:05 IST)
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.
 
अनेक अनुयायी एक ते दोन दिवस आधीच येऊन मुंबईत मुक्काम करत असतात. अशा अनुयायांसाठी शिवाजी पार्क मैदानात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. महापालिकेच्या सात शाळांमध्ये अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
बेस्टतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजगृह’हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 301 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. तसंच शिवाजी पार्क आणि मैदान परिसरात 18 फिरती शौचालयं, रांगेत उभे असणाऱ्यांसाठी चार फिरती शौचालयांची सुविधा देण्यात आली आहेत. तसंच पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स उभे करण्यात आले आहेत. अनेक अनुयायांना मोबाइल फोन रिचार्ज करण्याची समस्या भेडसावत असते. त्यांच्यासाठी 300 पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती