फ्लिपकार्टने ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला

शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:15 IST)
आता ई कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार फ्लिपकार्टने आता ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे.
 
फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती