IPL 2024: हा वेगवान गोलंदाज कॉनवेच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज मध्ये सामील झाला

शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (16:28 IST)
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर डेव्हन कॉनवे संपूर्ण IPL 2024 हंगामातून बाहेर पडला आहे. पाच वेळचा चॅम्पियन चेन्नईने न्यूझीलंडच्या या स्फोटक फलंदाजाच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनचा समावेश केला आहे. रुतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संघाने आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि सहा पैकी चार सामने जिंकले आहेत आणि सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडकडून खेळताना कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती .चेन्नईला मे पर्यंत कॉनवेची सेवा मिळण्याची आशा होती, परंतु कॉनवेला दुखापतीतून पूर्णपणे सावरता आले नाही आणि त्याला संपूर्ण आयपीएल हंगामाला मुकावे लागले. सीएसकेला गेल्या मोसमात पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात कॉनवेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2023 च्या मोसमात त्याने 672 धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 47 धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 
 
ग्लीसन जो कॉनवेच्या जागी सीएसकेमध्ये सामील झाला आहे, तो संघाचा गोलंदाजी विभाग मजबूत करेल. ग्लिनचा समावेश सीएसकेसाठी दिलासादायक बातमी आहे कारण संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) फक्त 1 मे पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. मुस्तफिझूरने सीएसकेसाठी यंदा चांगली  कामगिरी केली आहे. 
 
ग्लीसनने 2022 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी इंग्लंडकडून पदार्पण केले. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात त्याने पहिल्या आठ चेंडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या विकेट घेतल्या. ग्लीसनने आतापर्यंत 90 टी-20 सामने खेळले आहेत आणि 8.18 च्या इकॉनॉमीने 101 बळी घेतले आहेत.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती