मुंबईतील बंदोबस्ताहून परतलेल्या ५१ एसआरपीएफ जवानांना कोरोना

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (17:41 IST)
बकरी ईद आणि राम मंदिर भूमिपूजन बंदोबस्तासाठी मुंबईला गेलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तुकडीतील अधिकाऱ्यासह एकूण ९२ पैकी ५१ जवानांना कोरोना संसर्ग झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईहून परतीच्या प्रवासात ९२ पैकी १६ जणांना तीव्र लक्षणे होती तरीही त्यांना जालन्यातील पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये तब्बल चार दिवस एकत्र ठेवण्यात आले. त्यामुळे १६ जवानांनी इतर ३५ जणांना संक्रमित केल्याचे उघडकीस आले. १ ऑगस्टला बकरी ईद होती. त्यासाठी जालन्याची कंपनी बंदोबस्तासाठी ३० जुलैला रवाना केली होती. १० ड्रायव्हर, ८० जवान, २ उपनिरीक्षकांचा त्यामध्ये समावेश होता.
 
१२ दिवसांचा बंदोबस्त केल्यावर ८ ऑगस्टला ही तुकडी रात्री जालन्यातील पोलिस ट्रेनिंग स्कूलला परतली. मात्र, परतीच्या प्रवासातच १६ जणांना तीव्र स्वरूपाची लक्षणे होती. त्यांना अलगीकरण कक्षात ठेवून कोरोना तपासणी करण्याऐवजी सर्वांसोबतच ठेवण्यात आले. दोन दिवसांनंतर मंगळवारी दुपारी १६ जणांना जिल्हा रुग्णालयात नेऊन आरटी-पीसीआर तपासणी केली. सर्वच जण पॉझिटिव्ह आले.
 
त्यामुळे वरातीमागून घोडे दामटत ‘पीटीएस’मधील ७६ क्वॉरंटाइन कर्मचाऱ्यांची बुधवारी तपासणी केली. त्यांचा काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अहवाल आला. ७६ पैकी ३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ४१ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांनाही तूर्त क्वॉरंटाइन राहावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती