पानिपत चित्रपटावरून अफगाणिस्तानामध्ये का रंगला आहे वाद?

गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (10:52 IST)
आशुतोष गोवारीकरचा बहुचर्चित पानिपत हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पानिपतचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरवरून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
 
पण पानिपतवरून केवळ भारतातच चर्चा सुरू आहे असं नाही, तर या चित्रपटावरून अफगाणिस्तानातही वाद रंगला आहे.
 
पानिपत चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर पाहून अफगाणी सोशल मीडियावरही लोकांच्या मिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
 
6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त यांनी दुर्रानी साम्राज्याचे संस्थापक अहमद शाह अब्दाली यांची भूमिका साकारली आहे.
 
या चित्रपटात 1761 सालच्या अब्दाली आणि मराठे यांच्यातल्या ऐतिहासिक पानिपत युद्धाचा घटनाक्रम दाखवण्यात आला आहे.
 
पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते?
पानिपतच्या युद्धात या कारणांमुळे झाला होता मराठ्यांचा पराभव
अफगाणिस्तानातील काही फेसबुक आणि ट्विटर युजर्सनी भारतीय चित्रपट निर्माते आणि प्रशासनावर टीका केली आहे.
 
अफगाणिस्तानात अब्दालीला आदरानं `अहमद शाह बाबा' म्हटलं जातं. चित्रपटात त्यांचं पात्र नकारात्मक रंगवू नये, असं अफगाणी सोशल मीडियावरून सांगण्यात आलं आहे.
 
अब्दुल्ला नूरी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "डिअर बॉलिवुड, मी अफगाणी आहे. लाखो अफगाणी लोकांप्रमाणेच मीही बॉलिवूडप्रेमी आहे. संजय़ दत्त माझे आवडते अभिनेते आहेत. पानिपत चित्रपटात अहमद शाह दुर्रानी यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला जाणार नाही अशी आशा मला वाटते."
 
Image copyrightTWITTER
काही युजर्स मात्र चित्रपट पाहण्यापूर्वी अशा प्रतिक्रिया देऊ नयेत असं म्हणत आहेत. अब्दाली यांच्या ऐतिहासिक भूमिकेचा वेगळा दृष्टीकोनही स्वीकारावा असं त्यांना वाटतं.
पश्तु भाषेतल्या शमशाद टीव्हीनं या विषयावर टिप्पणी केली होती. त्यावर मोहम्मद कासिल अकबर सफी यांनी म्हटलं आहे, अहमद शाह बाबा आमचे हिरो आहेत. आम्हाला गर्व आहे त्यांचा. युद्धात भारतीयांचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे ते शाह बाबांना हिरो मानणार नाहीत.
 
प्रदर्शनापूर्वी व्हावं चित्रपटाचं परीक्षण
शमशाद टीव्हीनं चित्रपटाबाबत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचं परीक्षण व्हावं, असं म्हटलं आहे.
 
संजय दत्त यांनी या चित्रपटाचं पोस्टर ट्वीटरवर शेअर केलं होतं. त्यावर अफगाणिस्तानचे माजी राजदूत शाइदा अब्दाली यांनी ट्वीट करून म्हटलं, "डिअर संजय दत्त, भारत आणि अफगाणिस्तानातील संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय चित्रपटांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्यातला सामाईक इतिहास `पानिपत' सिनेमाद्वारे दाखवताना महत्त्वाचे घटनाक्रम डावलले जाणार नाहीत याची काळजी घेतली असेल अशी आशा मला वाटते."
 
मुंबईतले अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास अधिकारी नसीम शरीफी यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे. "अहमद शाह बाबा यांचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही यासाठी गेल्या दीड वर्षांपासून भारतातील अफगाणी मुत्सद्दी प्रयत्नशील आहेत. अहमद शाह बाबा यांची भूमिका खराब असती तर ती मी स्वीकारलीच नसती, असं संजय दत्त यांनी मला सांगितलं आहे.''
 
'वस्तुस्थिती' स्वीकारण्याचे आवाहन
शमशाद टीव्हीवरच्या पोस्टवर फैज हाक पारस्त लिहितात, की या चित्रपटात जर तथ्य असेल तर मी त्याचं जोरदार समर्थन करतो, तसंच हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा असं मला वाटतं.''
 
गुफरान वासिक यांनी ट्वीट करून अब्दालीच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की अहमद शाह अब्दाली हे एक आक्रमणकर्ते होते, ही गोष्ट उघड आहे. त्यात गर्व करण्यासारखं काहीच नाहीये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती