कुठलं वैर नव्हतं, मुलं त्याच्याकडे केस कापायला जायची, तरीही त्याने त्यांची हत्या केली

गुरूवार, 21 मार्च 2024 (15:46 IST)
13 वर्षांचा आयुष, 8 वर्षांचा आहान आणि 10 वर्षांचा पीयूष. हे तिन्ही भाऊ उत्तर प्रदेशातल्या बदायूंच्या बाबा कॉलनीतील घरामध्ये आई-वडील आणि आजीबरोबर राहत होते. काही दिवसांत येणाऱ्या होळीच्या उत्सवासाठी तिघं खूपच उत्साही होते, असं त्यांचे त्यांचे वडील विनोद कुमार म्हणाले. त्यांच्या आई संगितादेवी यांनी होळीनिमित्त त्यांच्यासाठी नवीन कपडे आणि बूट अशी खरेदीही केली होती. पण संगिता यांच्या घरात होळीचा आनंद येण्यापूर्वीच दुःखाचा असा डोंगर कोसळला की, सगळं काही अगदीच बदलून गेलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी आयुष आणि आहान यांची साजीदनं घराच्या छतावर हत्या केली होती. विनोद कुमार यांच्या घराच्या समोरच साजीद यांचं केस कापण्याचं दुकान आहे.
 
पीयूष घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार
आम्ही घराच्या छतावर गेलो तेव्हा त्याठिकाणची प्रत्येक गोष्ट घडलेल्या घटनेची साक्ष देत होती. पीयूषनं भावांची हत्या होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आम्ही गेलो तेव्हा, आई संगितादेवी यांच्या पायाजवळ तो लोटलेला होता. त्याच्या बोटावर पट्टी बांधलेली होती. साजीदनं त्यावरही हल्ला केला होता, पण तो खाली पळून आल्यामुळं वाचला असं पीयूषनं सांगितलं. "मी वर गेलो तेव्हा त्यांनं मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझे भाऊ जमिनीवर पडलेले होते. त्याच्या (आरोपी साजीदच्या) पायात काच घुसलेली होती. त्यामुळं त्याचा पाय सरकला आणि तेव्हाच पळालो. मी आई आणि आजीला आवाज दिला. दादाला त्यानं मारलं असं मी ओरडलो," असं पीयूषनं म्हटलं. मुलांच्या आई संगितादेवी यांनी त्यांच्या पायावर लागलेल्या जखमेकडं पाहत म्हटलं की, "मी मुलांचे मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी नेण्यापासून अडवलं तर पोलिसांनी मला धक्का दिला आणि मी खाली पडले." पीयूषच्या आजी मुन्नीदेवी म्हणाल्या की, "हा छोटा ओरडत आला की, अम्मा बघ वर काय झालंय. तेवढ्यात तो (आरोपी साजीद) सुरा घेऊन आला आणि त्यांच्याकडं (संगिता) इशारा करत बोलू लागला. त्यानंतर आम्ही आरडा-ओरडा केला आणि गेट बंद केलं. नंतर पोलिस आले आणि त्यांना घेऊन गेले." मुन्नीदेवी म्हणाल्या की, मुलं घराच्या समोरच्या दुकानात साजीदकडून केस कापून घेण्यासाठी जात होते. तो काही अनोळखी व्यक्ती नव्हता. संपूर्ण कॉलनीतले लोक त्याला ओळखत होते. लोक त्याच्याकडं केस कापण्यासाठी जायचे. वडील म्हणाले-जावेदचंही एन्काऊंटर केलं तर गूढ नष्ट होऊन जाई मुलांचे वडील विनोद कुमार म्हणाले की, ते आणि त्यांचं कुटुंब आरोपी साजीदला ओळखत होते. त्यांचं कॉस्मेटिकचं दुकान होतं त्यामुळं तो तिथून सामान खरेदी करत होता. विनोद म्हणाले, "माझ्या पत्नीनं मला तो पैसे मागत असल्याचा फोन केला. मी म्हणालो ठिक आहे, देऊन टाक उद्या परत देईल." साजीदनं पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर हल्ला केला तर प्रत्युत्तराच्या कारवाईत गोळी लागल्यानं त्याचा मृत्यू झाला, असं पोलिसांचं म्हणणं आहे. "साजीदचा भाऊ जावेद पकडला जावा अशी आमची इच्छा आहे. आमचं त्याच्याशी बोलणं करून द्यावं आणि आमच्याबरोबर असं का केलं? याचा तपास केला जावा. आम्ही त्याचं काय वाईट केलं होतं? या गोष्टींची माहिती मिळाली तरच याच्या मागे कोण आहे, ही नेमकी माहिती मिळेल. त्याचंही एन्काऊंटर केलं तर सर्व गूढ त्याच्याबरोबर संपून जाईल," असं विनोद कुमार म्हणाले. विनोद कुमार यांच्या घरात मुलांच्या स्कूल बॅग एका कोपऱ्यात पडलेल्या होत्या. दुसरीकडं त्यांच्या शाळेचे गणवेश, बेल्ट आणि बूट पडलेले होते. भिंतीवर मुलगा आयुषच्या नावाचं एका सत्संगाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र लावलेले होते. त्यावर त्यानं हातानं काढलेलं एक चित्र होतं. त्यात इंग्रजीमध्ये "गुड बॉय" लिहिलं होतं. आयुष आणि आहान अभ्यासात हुशार होते असं विनोद कुमार म्हणाले. होळीचा उत्सव पुढच्या सोमवारी होता त्यामुळं आईनं मुलांसाठी कपडे आणि बूट विकत आणले होते. "आता ते पडूनच राहतील," असं विनोद कुमार म्हणाले. "आमच्या मनात भितीचं वातावरण आहे. मुलांची हत्या नेमकी का केली हेच आम्हाला माहिती नाही. आम्ही काय विचारायचं तुम्हीच सांगा? माझं तर त्यांच्याशी काही शत्रूत्वही नव्हतं. त्यामुळं मुलांच्या हत्येसाठी काहीतरी कट नक्कीच रचलेला असेल ना?" असं विनोद कुमार म्हणाले.
 
साजीदच्या कुटुंबीयांचं म्हणणं काय?
ज्या घरात ही घटना घडली तिथून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर साखानू गावात साजीद आणि जावेद यांचं घर आहे. साजीदनं त्याच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी पैसे उसणे मागितलं होते, असं मृत मुलांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण साजीद आणि जावेद यांच्या आई नाझरीन यांनी मात्र प्रसुतीचा विषय खरा नसल्याचं म्हटलं आहे. "पोलिस आले आणि म्हणाले की, यानं मुलांची हत्या केली आहे. आता याचा मृत्यू होईल तर तुम्ही त्याचं कफनही आणून ठेवा. कारण तोही मारला जाईल," असं त्यांनी सांगितलं. साजीद पोलिसांबरोबरच्या चकमकीत मारला गेल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याचं आम्ही विचारलं, त्यावर "पोलिसांनी मला येऊन तुमच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गोळी लागून मारला गेला," असं सांगितल्याचं त्या म्हणाल्या. शेवटी त्या म्हणाल्या की, त्यांच्या मुलांना यात गोवलं जात आहे. पीडित कुटुंबाबरोबर काहीही वैर नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं. पोलिस सध्या जावेदचा शोध घेत असून त्याच्या कुटुंबीयांची चौकशीही करत आहेत.
 
Published By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती