आठवडाभरात पावसाने मोडला पन्नास वर्षांचा रेकॉर्ड

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (10:13 IST)
गेल्या पन्नास वर्षांतील सरासरीच्या तुलनेत या वर्षीच्या ८ ते १४ ऑगस्ट या आठवडाभराच्या काळात देशभराततब्बल ४५ टक्के एवढ्या अधिक पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केली आहे. महत्वाचा भाग म्हणजे १ जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या पूर्ण हंगामात मात्र आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अवघा एक टक्का अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
 
८ ते १४ ऑगस्टपर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथे सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानात अधिक पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराममध्ये सामान्य पाऊस नोंदविण्यात आला आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, आसामचा काही भाग, बिहार, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर राज्यांत उणे म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
 
गेल्या दोन दिवसांपासून सांगली, सातारा आणि कोल्हापुरात हलका पाऊस सुरू आहे. आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्येमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. केवळ हलका पाऊस सुरू राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण मान्सूनची दुर्बल झालेली लाट आहे. महाराष्ट्राच्या इतर विभागांतही पावसाचा जोर कमी झाला आहे, अशी माहिती 'स्कायमेट'कडून देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती