शिवाजींच्या चेहऱ्यावर मोदी - व्हीडिओवरून वाद

बुधवार, 22 जानेवारी 2020 (13:00 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तान्हाजी' चित्रपटातील दृश्यांचा वापर केलेला एक व्हीडिओ मंगळवारी (21 जानेवारी) दिवसभर चर्चेत राहिला. या व्हीडिओमध्ये 'तान्हाजी' सिनेमातील दृश्यांशी छेडछाड करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला होता.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभानच्या रूपात दाखविण्यात आलं होतं.  
 
दिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओवरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वाद सुरू झाल्यानंतर 'पॉलिटिकल कीडा' या पेजने वादग्रस्त हा व्हीडीओ युट्यूबवरून काढून टाकला.
 
"हा व्हीडिओ 'पॉलिटिकल कीडा' नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजप या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे," असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती