अण्वस्त्रांबाबत 'नो फर्स्ट यूज' धोरणात बदल होऊ शकतो - राजनाथ सिंह

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (10:55 IST)
काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण असताना भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्र वापराबाबत अत्यंत मोठं विधान केलंय. अण्वस्त्रांबाबत 'नो फर्स्ट यूज' हेच भारताचं धोरणं राहिलं आहे, मात्र पुढे काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. 
 
"अटल बिहारी वाजपेयींनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी 'नो फर्स्ट यूज' हे धोरणही निश्चित केलं. भारत हे धोरण कसोशीने पाळत आहे. मात्र, भविष्यात काय होईल, हे परिस्थितीवर अवलंबून असेल." असं राजनाथ सिंह म्हणाले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरण येथे जाऊन आदरांजली वाहिली.
 
जबाबदार अण्वस्त्रधारी देश अशी भारताची ओळख आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून, वाजपेयींमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे, असंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती