पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये ‘आझादी’साठी मोर्चा सैन्याने LOCजवळ रोखला

सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (11:37 IST)
एमए जर्राल
पाकिस्तान प्रशासित काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादहून निघालेला 'आझादी मोर्चा' प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ पोहोचला आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेपासून सहा किलोमीटर अंतरावरच या मोर्चाला रोखलं आहे.
 
भारताने दोन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून भारत प्रशासित काश्मीरमध्ये कडक निर्बंध लावले आहेत. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.
 
मोर्चात सहभागी झालेले लोक रात्रभर रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते आणि सकाळी पुन्हा सीमेच्या दिशेने कूच करणार, असं त्यांनी सांगितलं.
 
दरम्यान, पाकिस्तान प्रशासित काश्मीरचं सरकार आणि मोर्चेकऱ्यांमध्ये चर्चाही झाली. पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही.
 
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा तीन दिवसांपूर्वी मुजफ्फराबादमधून सुरू झाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकांना LOC न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे.
 
भारताविरुद्ध घोषणाबाजी करत सीमेच्या दिशेने आलेल्या हजारो लोकांपैकी एक असलेल्या शमा तारिक खान पेशाने वकील आहेत. त्या सांगतात, "ही LOC नाही. ही एक रक्ताळलेली भेग आहे, ज्याला LOC नाव देण्यात आलं आहे. ही रेषा मिटवून पलीकडे जावं, असं आम्हाला वाटतं. हे आमचं घर आहे. आम्हाला आमच्याच घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं आहे. आम्हाला का थांबवता? आम्ही आमच्या घरी, काश्मीरला चाललो आहोत."
JKLFशी संबंधित कार्यकर्ते शाहबाज काश्मिरी सांगतात, "आम्ही सीमारेषा मिटवण्यासाठी चाललो आहोत. जगातल्या इतर नागरिकांनीही आपल्या घराबाहेर पडावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. अल्लाहच्या मनात असेल तर ही सीमारेषा मिटेल."
 
मोर्चाचं उद्दीष्ट स्पष्ट करताना एक आंदोलनकर्ता दानिश सानिया यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्हाला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून स्वातंत्र्य हवं आहे. आमची भूमी 22 ऑक्टोबर 1947 ला ताब्यात घेण्यात आली. आम्ही आमच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी इथं आलो आहोत."
 
"आमची जमीन कुणीही खरेदी करू नये, यासाठी खास आमचं वैशिष्ट्य असलेलं कलम 35A रद्द करण्यात आलं. जी जमीन आमच्या पूर्वजांनी सात हजार वर्षं सांभाळून ठेवली. ती आम्हाला वाचवायची आहे. आमच्या काश्मिरीयतमध्ये कोणताच हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही," सानिया सांगतात.
 
संयुक्त राष्ट्राने या गोष्टीची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शमा तारिक खान सांगतात, "तिथं भारताच्या फौजा आहेत. इथं पाकिस्तानच्या फौजा आहेत. आम्ही तर जनता आहोत. संयुक्त राष्ट्राचा कोणताच प्रस्ताव आम्हाला पलीकडे जाण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही जे काही करत आहोत, त्यामुळे कायद्याचा भंग होत नाही. आम्हाला वाटतं की काश्मिरी लोकांसाठी नियंत्रण रेषा खुली करण्यात यावी. संयुक्त राष्ट्राने याची दखल घ्यावी."
 
पाकिस्तानी सैन्याने रोखला मोर्चा
आझादी मोर्चाला पाकिस्तानी सरकारने चिकोटी तपासणी नाक्यापासून सहा किलोमीटरवर चिनारीजवळ रोखलं आहे. मोर्चाला रोखण्यासाठी रस्त्यावर मोठमोठाले कंटेनर टाकून रस्ता अडवण्यात आला आहे. तसंच काटेरी तारा पसरवण्यात आल्या आहेत.
 
प्रशासनाने रोखल्यानंतर मोर्चेकरी श्रीनगर आणि उरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरच ठाण मांडून बसले आहेत. यादरम्यान मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी प्रशासनाशीही चर्चा केली. पण यातून कसलाही तोडगा निघू शकला नाही.
 
मोर्चाचं नेतृत्व करत असलेल्या तौकीर गिलानी यांनी बीबीसीला सांगितलं, "मोर्चेकरी रात्रभर रस्त्यावर बसून राहतील, सकाळ झाल्यावर ते LOCकडे निघतील."
 
मोर्चेकरी आणि सुरक्षा बल यांच्यात झटापटी होऊ नये, अशी इच्छा नसल्याचं तौकीर गिलानी यांनी स्पष्ट केलं.
 
पण मोर्चात सहभागी झालेले बहुतांश लोक LOCकडे जाण्यावर अडून बसले आहेत. पावसामुळे वातावरणातील थंडी वाढत चालली असताना आगीवर हात शेकणाऱ्या एका मोर्चेकऱ्याने सांगितलं, "काश्मीरचे तुकडे करणारी खूनी रेषा पार करून आम्हाला श्रीनगरला जायचं आहे. रात्रभर आम्ही धरण्यावर बसू. सकाळी उठल्यानंतर आम्ही LOCकडे कूच करणार आहोत."
 
तर झिशान भट्ट नामक एका आंदोलनकर्त्याने सांगितलं, "आम्ही जम्मू-काश्मीरचे निर्वासित आहोत. आझाद काश्मीरच्या बाग परिसरात आम्ही राहतो. बाग ते चिकोटीपर्यंत आम्ही मोर्चा काढला. एलओसी पार करून आपल्या घरी, काश्मीरमध्ये आणि श्रीनगरमध्ये आम्हाला जायचं आहे. आमचं उद्दीष्ट मोठं आहे. आम्ही आमच्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जात आहोत."
चर्चो फोल
यादरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये आणि जेकेएलएफदरम्यान रात्रीसुद्धा चर्चा झाली. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटशी संबंधित रफीक दार यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही आमच्या रस्त्यातील अडथळे पाहिल्यानंतर प्रशासनाशी चर्चा केली. आम्ही हे अडथळे हटवण्याची विनंती केली आहे. अडथळा न हटवल्यास आम्ही इथंच धरणे आंदोलनास बसणार आहोत."
 
तर पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे जनसंपर्क मंत्री मुश्ताक मिन्हास आणि कायदे मंत्री फारूख अहमद ताहीर यांनी मोर्चास्थळी जाऊन मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. मुश्तात मिन्हास यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही मोर्चावर नजर ठेवून आहोत. भारताच्या ताब्यातील काश्मीरची परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरेल. आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलो आहोत."
 
हा मोर्चा इथून पुढे जाऊ नये, असं सरकारला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे सांगतात, "इथून पुढे अशी ठिकाणं आहेत, जिथं भारतीय सैन्याच्या गोळ्या पोहोचू शकतात. हे आपले नवयुवक एका उमेदीनं इथं आले आहेत. यांच्या जीवाचं संरक्षण करणं काश्मीर सरकारची जबाबदारी आहे. ही खुनी रेषा आम्हालासुद्धा मान्य नाही. पण ही रेषा पार करावी, अशी स्थिती सध्या नाही. आमच्या नागरिकांची जीवित किंवा आर्थिक हानी होऊ नये, असं आम्हाला वाटतं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती