कोरोना पर्यटन: लॉकडाऊन आणि प्रवासबंदीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका

बुधवार, 29 एप्रिल 2020 (21:12 IST)
'कोरोनामुळे बसलेली प्रवासाची धास्ती दूर झाल्याशिवाय पर्यटन व्यवसाय रुळावर येणार नाही'
"ट्रॅव्हल इंडस्ट्री मुळातच प्रवासाशी संबंधित आहे आणि आता कोरोनामुळे तोच बंद झाला आहे. टूर मॅनेजरचं काम हे पर्यटकांसोबत फिरणं हे आहे. 'वर्क फ्रॉम होम' असा ऑप्शनच आमच्याकडे नाहीये. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आम्ही 'जॉबलेस'असल्यासारखेच आहोत," एका नामांकित पर्यटन कंपनीमध्ये टूर मॅनेजर म्हणून काम करणारी अमृता प्रधान सांगत होती.
 
कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत असताना त्याचे आर्थिक, सामाजिक परिणामही समोर येत आहेत. या व्हायरसमुळे सगळं जग ठप्प झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसायांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या इंडस्ट्रींपैकी एक म्हणजे पर्यटन.
 
लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोडा, अगदी जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशावेळी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व संपून लोक पुन्हा प्रवासाला कधी करणार याबद्दलच्या अनिश्चिततेनंही या ट्रॅव्हल इंडस्ट्रीला ग्रासलं आहे.
 
या सगळ्या अनिश्चिततेबद्दल बोलताना अमृतानं म्हटलं, "कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरणार असेल तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार जगभर ज्यापद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. पुढचं किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका आहे."
 
मार्च, एप्रिल, मे हा पर्यटन व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन असतो. या काळात सर्वाधिक बुकिंग होतात. लॉकडाऊनमुळे हाच सीझन वाया गेला असल्याचं अमृतानं म्हटलं. याचा फटका जसा पर्यटन कंपन्यांना बसला आहे, तसाच पर्यटकांनाही बसला असल्याचं तिनं सांगितलं.
 
"लोक परदेश प्रवासाचं बुकिंग जवळपास वर्षभर आधी करतात. या प्रवासाची पॅकेजेसही महागडी असतात. ट्रॅव्हल कंपन्यांकडून या सीझनच्या बुकिंगसाठी वापरलेले पैसे तुम्ही पुढे वापरू शकता, असं सांगितलं जात आहे. पण पुढे म्हणजे कधी? इथे आता उद्याचीच शाश्वती नाहीये. त्यामुळे लोकांना रिफंडच हवा आहे. पण ट्रॅव्हल कंपन्यांचेही पैसे विमान कंपन्या, हॉटेल्सकडे अडकलेले आहेत. अशावेळी पर्यटकांना केवळ 40 टक्के रक्कम परत देण्यात येत आहे. हे खरं तर सगळ्यांसाठी तोट्याचं आहे. लॉकडाऊनमुळे एका रात्रीत सगळं चित्रच बदललं."
 
पुढचं वर्ष पर्यटन व्यवसायासाठी कठीण
साधारणपणे ऑक्टोबर 2021 पर्यंत कोरोनाच्या संकटातून पर्यटन व्यवसाय सावरणार नाही, असं मत औरंगाबाद पर्यटन विकास संघटनेचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी व्हायला लागली होती.
 
गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2019 दरम्यान अजिंठा लेणीला 4 हजार 218 विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा याच कालावधीत ही संख्या फक्त 3 हजार 202 इतकी होती. त्यानंतर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
 
"एप्रिलपर्यंत पर्यटनाचा सीझन असतो, पण हा सीझन मध्येच वाया गेला. आणि आता किमान एक ते दीड वर्ष परिस्थिती सुधारणार नाही. लोक प्रवासाला घाबरले आहेत, त्यामुळे किती परदेशी पर्यटक येतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण केवळ औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाचा विचार केला, तर जवळपास 200 कोटी रुपयांचं नुकसान होईल. कारण ही पर्यटन एक साखळी आहे. यामध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्स, गाईड, छोटे दुकानदार असे अनेक जण असतात. या सगळ्यांच्याच रोजगारावर आता कुऱ्हाड आली आहे," असं जसवंत सिंग यांनी म्हटलं
 
कोरोनामुळे डिसेंबरपर्यंत परदेश प्रवास सुरू होईल की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. पण किमान सरकारनं ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून देशांतर्गत पर्यटनाला सुरूवात केली तर या व्यवसायाला थोडा तरी आधार मिळेल, अशी अपेक्षाही जसवंत सिंग यांनी व्यक्त केली.
 
वनपर्यटन बंद झाल्यामुळे वनविभागाचेही नुकसान
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचीही परिस्थिती अशीच आहे. बुकिंग रद्द झाल्यामुळे ताडोबालाही आर्थिक फटका बसला आहे.
 
देशभरातील लॉकडाऊनमुळे 15 मार्चपासून राज्यातील संरक्षित वनं आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. आता पुढील आदेशापर्यंत वनपर्यटन बंद करण्यात येत असल्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पही अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.
साधारणत: पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन साडेतीन महिने व्याघ्र प्रकल्प बंद असतात. त्यामुळे आता आणखी पुढील चार महिने ताडोबा बंद राहणार आहे .
 
सर्वकाही सुरळीत झाले तर ऑक्टोबरपासूनच पुन्हा ताडोबा पर्यटकांसाठी खुलं होईल. त्यामुळे या वर्षी ताडोबा प्रकल्पात सहा महिन्यांच्या उत्पानावर वनविभागाला पाणी सोडावे लागणार आहे. वर्षांला एकट्या ताडोबातून प्रवेश फी आणि इतर शुल्क याचा हिशोब करता दहा ते बारा कोटी रुपये उत्पन्न होतं. आता सहा महिने ताडोबा बंद असल्याने वनविभागाचं पाच ते सहा कोटी रुपयाचं नुकसान होण्याचा अंदाज ताडोबाचे क्षेत्र अधिकारी एन. आर. प्रवीण यांनी वर्तवला आहे.
 
"वर्षाकाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशविदेशातून दोन लाख पर्यटक येतात. महिन्याला ही संख्या 15 हजार एवढी आहे. या पर्यटनावर ताडोबाच्या आसपासच्या गावातील हजारो लोकांचे उत्पन्न अवलंबून आहे. यांतील जिप्सिचालक, गाईड , हॉटेल आणि रिसार्टमध्ये काम करणारे यांचा समावेश आहे," असं प्रवीण यांनी सांगितलं.
हॉटेल बुकिंग रद्द
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली कोकणची किनारपट्टी ओस पडली आहे. धार्मिक स्थळं बंद असल्यानं कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, नाशिक यासारख्या तीर्थक्षेत्रावर आधारलेली अर्थव्यवस्थादेखील संकटात आहे.
 
पुढचे काही महिने पर्यटन व्यवसायासाठी वाईट असणार, असं 'कंफेडरेशन ऑफ इंडस्ट्री'ने (CII) कोरोना व्हायरसच्या परिणामांवर अभ्यास करताना म्हटलंय.
 
धार्मिक तीर्थस्थळंही ओस पडली आहेत
CIIच्या रिपोर्टनुसार पर्यटन व्यवसायानं ऑक्टोबर 2019 पासून मार्च 2020 पर्यंत 28 अब्ज डॉलरचा महसूल उत्पन्न करणं अपेक्षित होतं. पण आता कोरोनामुळे या महसूलात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.
 
CIIच्या रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चपर्यंतची 80 टक्के हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आली होती. पर्यटन व्यवसायात हॉटेल बुकिंग अनेक महिने आधी केली जातात. ऑक्टोबर 2020 पासून मार्च 2021 पर्यंतची हॉटेल बुकिंग होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी अद्याप बुकिंग सुरू केलेली नाही.
 
6 मार्चला CIIने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली आहे.
 
CIIच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दीपक हकसर यांच्या मते, "पर्यटनयाविषयी आताच काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण, भारतातील स्थिती पूर्वपदावर येणं हे विदेशात कशी परिस्थिती आहे, यावर अवलंबून असेल."

'गणपतीनंतर देशांतर्गत प्रवास सुरू होऊ शकतो'
गेल्या काही वर्षात ट्रॅव्हल अँड टूरिझम हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला होता. पण आता कोरोनामुळे प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण माझ्या अंदाजाप्रमाणे गणपतीनंतर देशांतर्गत प्रवासाला सुरूवात होईल. लोक लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे लोकांच्या हातातला पैसा कमी होईल. त्यामुळे बजेट ट्रॅव्हलला प्राधान्य दिलं जाईल, असं मत वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जानेवारी-फेब्रुवारीपासून परिस्थिती सुधारेल असा अंदाज वीणा पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, यामध्ये द्विराष्ट्रीय संबंध गुंतलेले असल्यामुळे कोणत्या देशात कधी पर्यटन सुरू होईल हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल असं वीणा पाटील यांनी म्हटलं.
 
"या परिस्थितीत पर्यटन व्यवसायाला आर्थिक तोटा होणारच आहे आणि ते सर्वांनीच स्वीकारलं असल्याचं वीणा पाटील यांनी म्हटलं. ट्रॅव्हल आणि एव्हिएशन इंडस्ट्री या मुळातच प्रॉफिट कमावणारे व्यवसाय नाहीयेत, त्यांचा बिझनेस व्हॉल्यूमवर अवलंबून असतो. अशापरिस्थितीत पर्यटन व्यवसाय जानेवारीपर्यंत तग धरून राहू शकतो. तोपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे."
 
पर्यटन व्यवसायाचं नेमकं किती नुकसान झालंय याबद्दल सांगताना वीणा पाटील यांनी असा नेमका आकडा सांगता येणार नाही, असं म्हटलं. "पर्यटन व्यवसायात संघटित क्षेत्रातल्या नुकसानाची आकडेवारी आपल्याला मिळेल, पण या इंडस्ट्रीमध्ये असंघटित लोकांची संख्या खूप अधिक आहे. संघटित-असंघटित क्षेत्राचा मिळून असा आकडा इतक्यात मिळू शकणार नाही."
 
'पर्यटन सुरू करण्याची घाई करणार नाही'
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंबंधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजस्थानचे पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह भरतपूर यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. त्यासंबंधी त्यांनी ट्वीटही केलं होतं.
 
दरम्यान, पर्यटन व्यवसायाचं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधला.
 
"महाराष्ट्रातील याआधीच्या कुठल्याही सरकारच्या तुलनेत यंदा सर्वाधिक निधी पर्यटन क्षेत्राला मिळालाय. त्यामुळं आम्ही पर्यटन क्षेत्राला खूप महत्त्व दिलंय, हे स्पष्ट आहे. या क्षेत्रातून नवीन रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे," असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
 
"देशातील आणि राज्यातील सद्यस्थिती पाहता पर्यटन क्षेत्र सर्वात उशिरा उघडणारं असेल. उद्योग, नियमित रोजगार, बँका यांना उघडण्यास प्राधान्य दिलं जाईल. मात्र, हेही खरंय की, आजच्या स्थितीत सर्वाधिक फटका कुठल्या क्षेत्राला बसला असेल, तर पर्यटन क्षेत्राला बसला आहे."
 
आदिती तटकरे यांनी म्हटलं, "ज्यावेळी हे आरोग्य संकट निघून जाईल, त्यावेळी मंदिर, दर्गा, चर्चा हे उघडण्याला प्राधान्य देऊ. मात्र, या सर्व धार्मिक स्थळांमधील स्वच्छता करण्यावर आमचा भर राहील. तिथं मेडिकल स्कॅनरही उपलब्ध करून दिले जातील. पण अर्थात, हेही उघडण्यामध्ये कुठलीही घाई केली जाणार नाही."
 
"सध्यातरी पर्यटन क्षेत्र सर्वात शेवटी उघडलं जाईल, अशीच स्थिती आहे. तसंच, पर्यटन सुरू करताना ICMR चे नियम काय असतील, हेही पाहिलं जाईल," असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती