IndvsEng: कृणाल पंड्याचा वनडे पदार्पणात फास्टेस्ट फिफ्टीचा विक्रम

मंगळवार, 23 मार्च 2021 (20:56 IST)
रवींद्र जडेजा संघात नसल्याने पदार्पणाची संधी मिळालेल्या अष्टपैलू कृणाल पंड्याने संधीचं सोनं करत वेगवान अर्धशतकी खेळी केली. कृणालने 26 बॉलमध्येच अर्धशतकाला गवसणी घालत पदार्पणात वेगवान अर्धशतकाचा विक्रम रचला.
1990 मध्ये जॉन मॉरिस यांनी पदार्पणात 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कृणालने त्यांचा विक्रम मोडला.
विराट कोहली आणि शिखर धवन या दिल्लीकरांनी टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली. मात्र ठराविक अंतरात दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली.
कोहलीने 56 तर धवनने 98 रन्स केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच धवन बाद झाला आणि टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर (6) तर हार्दिक पंड्या एक रन करून तंबूत परतले.
यानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत टीम इंडियाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. कृणालने 31 बॉलमध्ये 58 रन्स करताना सात चौकार आणि दोन षटकार लगावले तर राहुलने 43 बॉलमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 61 बॉलमध्ये 112 रन्सची भागीदारी केली.
टीम इंडियाने 317 रन्सची मजल मारली. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रसिध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांनी पदार्पणाची संधी दिली.
25 वर्षीय कृष्णा डोमेस्टिक क्रिकेटमधील 'दादा संघ' अर्थात कर्नाटकचा फास्ट बॉलर आहे. 48 लिस्ट ए मॅचेस त्याच्या नावावर आहेत. आर. विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन या अनुभवी फास्ट बॉलरच्या तालमीत प्रसिध तयार झाला आहे.
आयपीएल स्पर्धेत प्रसिध काही हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा नेट बॉलर होता. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रसिधला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं.
त्याच हंगामात त्याला कोलकातासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्या हंगामात त्याने दहा विकेट्स घेतल्या. मात्र इकॉनॉमी रेट फारसा आश्वासक नव्हता. 2019 हंगामात प्रसिधला विशेष चमक दाखवता आली नाही. तो 11सामन्यात खेळला.
भारतीय अ संघातर्फे प्रसिध नियमितपणे खेळतो. 2018मध्ये दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध प्रसिधने मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या.
गेल्या वर्षी याच सुमारास, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसिधचं कौतुक केलं होतं. ट्वेन्टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर प्रसिध एक्स फॅक्टर ठरू शकतो असं कोहलीने म्हटलं होतं. कोरोनामुळे वेळापत्रक कोलमडल्याने प्रसिधचं पदार्पण लांबणीवर पडलं.
काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत प्रसिधने सात सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या.
 
कृणाल पंड्या
ट्वेन्टी-20 संघाचा भाग असलेल्या कृणालला वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत बडोद्यासाठी खेळताना कृणालने पाच सामन्यात 338 रन्स करताना दोन शतकं आणि दोन अर्धशतकांची नोंद केली होती. या स्पर्धेत कृणालने पाच विकेट्सही पटकावल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या कृणालच्या नावावर 46 विकेट्स आणि 1000 रन्स आहेत.
कृणालने 18 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
टीम इंडियाने चार सामन्यांची टेस्ट सीरिज 3-1 अशी जिंकली तर पाच सामन्यांची ट्वेन्टी-20मालिका 3-2अशी जिंकली. गहुंजेत तीन वनडे होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना ही सीरिज होणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती