भारत आणखी एका हल्ल्याच्या तयारीत’: पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळून लावला

सोमवार, 8 एप्रिल 2019 (09:56 IST)
भारत आणखी एका कारवाईची तयारी करत असून या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध युद्धाची योजना आखत आहे, हा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.
 
"भारताकडून तयारी सुरू आहे. पाकिस्तानवर अजून एखादा हल्ला होण्याची शक्यता आहे. आमच्या माहितीनुसार 16-20 एप्रिल दरम्यान भारताकडून लष्करी कारवाई केली जाईल," असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पंजाब प्रांतातील मुलतानमध्ये रविवारी एका पत्रकार परिषदेत केला होता.
 
भारताने मात्र "पाकिस्तानच्या बेजबाबदार वक्तव्यांचा निषेध" केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, "त्यांच्या देशात युद्धाचं वातावरण निर्माण करणं, हाच पाकिस्तानचा उद्देश आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या कट्टरवाद्यांना भारतावर हल्ला करावा असा छुपा संदेश देण्याचा हा प्रकार आहे."
 
अशी स्फोटक वक्तव्यं करण्यापेक्षा आपल्या देशात कट्टरवाद्यांवर कारवाई करायला हवी, असंही ते पुढे म्हणाले.
 
पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेल्या पाच देशांना सर्वांत आधी या हल्ल्यासंबंधी माहिती दिली, असं कुरैशींनी स्पष्ट केलं होतं.
 
पाकिस्तान काय म्हणाला?
 
"भारत एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पाकिस्तानविरूद्ध अजून एका लष्करी हल्ल्याची तयारी करत असल्याची गोपनीय माहिती आमच्याकडे आहे," असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे.
 
"एक नवीन नाटक रचून जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारखा प्रकार घडवून आणला जाईल. अशा प्रकारे पाकिस्तानवर दबाव वाढवून आपली कारवाई कशी योग्य आहे, हे ठरविण्यासाठी प्रयत्न केले जातील," असंही शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं होतं.
 
ही माहिती मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायालाच नाही तर पाकिस्तानी जनतेलाही यासंबंधी सतर्क करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतल्याचं कुरैशी यांनी सांगितलं होतं.
 
लक्ष्य आधीपासूनच निर्धारित
शाह महमूद कुरैशी यांनी हा दावा करताना माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांचा हवाला दिला. "काही दिवसांपूर्वी संसदीय सुरक्षा समितीची बैठक झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीला तीनही सेनादलांचे प्रमुखही उपस्थित होते. आम्ही कारवाईसाठी तयार आहोत, आम्हाला केवळ सरकारी परवानगीची गरज आहे, असं सेनाप्रमुखांनी सांगितलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, की आम्ही तुम्हाला सुरुवातीपासूनच 'फ्री-हँड' दिला आहे."
 
त्यांनी म्हटलं, "आम्ही लक्ष्यही निश्चित केलं आहे, असं अधिकाऱ्यांनी मोदींना सांगितलं. आम्ही निश्चित केलेलं लक्ष्य पाकिस्तान प्रशासित काश्मीर आणि जम्मू-काश्मिरपुरतं मर्यादित नसेल तर काश्मिरच्या बाहेरीलही असेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं."
 
"पाकिस्ताननं यापूर्वीही शांततेचा पुरस्कार केला आहे आणि आजही करत आहेत. मात्र आमच्यावर झालेल्या कोणत्याही लष्करी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायद्यानं आम्हाला दिला आहे," असं कुरेशींनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.
 
भारताने मात्र पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. प्रत्युत्तरात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, "सर्व मुत्सद्दी आणि DGMOच्या माध्यमातून संभाव्य कट्टरवादी हल्ल्यांशी निगडीत विश्वसनीय माहिती शेअर करावी, असा सल्ला पाकिस्तानला देण्यात आला आहे."
 
सीमेवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे असंही ते पुढे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती