चांद्रयान 2: मून लॅंडर विक्रमचा संपर्क तुटला - इस्रोची घोषणा, नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण

चंद्रावर पाणी असल्याचं आपणच जगाला सांगितलंय. त्यामुळे आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीय. आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा संदेश पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना दिला.
 
भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे त्याच्या मून लँडर 'विक्रम'चं चंद्रावर उतरणं. साऱ्या देशाचं लक्ष या ऐतिहासिक घटनेकडे असतानाच मून लॅंडर विक्रमचा संपर्क तुटला असल्याची घोषणा इस्रोने पहाटे केली.
 
सकाळी 8 वाजता - पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला उद्देशून संदेश
पंतप्रधान मोदी सध्या राष्ट्राला उद्देशून संदेश देत आहेत. त्यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे -
 
•मला तुमची मनस्थिती समजत होती, पण निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे.
 
•आपल्याला खूप आशा होत्या, कारण यामागे तुमची मेहनत होती.
 
•काही अडथळे आले असतील, मात्र यातून आपला धीर खचला नाही, उलट आणखी कणखर झालाय
 
•चंद्राला कवेत घेण्याची आपली इच्छाशक्ती आणखी प्रबल झालीय.
•मी तुमच्या पाठीशी आहे, देश तुमच्या पाठीशी आहे.
 
•प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडथळा आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतं.
 
•चांद्रयान-2 मोहिमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नसला तरीही त्याचा प्रवास शानदार होता.
 
•अंतराळ शक्तीमध्ये जगातील मोजक्या देशात भारत अव्वल स्थानी आहे. शंभरहून अधिक सॅटेलाईट एकदाच लॉन्च करून आपण एक नवीन विक्रम केलाय. चंद्रावर पाणी असल्याचं आपणच जगाला सांगितलंय.
 
•आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीय. पुढे जायचंय, ध्येय गाठेपर्यंत थांबायचं नाही, आपण नक्कीच यशस्वी होऊ.
 
•विज्ञान परिणामांमुळं नाराज होत नाही, प्रयत्न हेच विज्ञानाचं वैशिष्ट्य.
 
सकाळी 7 वाजता - देशभरातून कौतुक, इस्रोला धीर देण्याचा प्रयत्न
 
भारताच्या 'चांद्रयान 2'चं मून लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटल्याची घोषणा इस्रोनं रात्री केली. देशभरातून त्यांच्या कामगिरीचं मात्र कौतुक होतंय आणि त्यांना धीर दिला जातोय. राजरकारण्यांपासून ते सेलेब्रिटी, असे सगळेच इस्रोचं कौतुक करून शास्त्रज्ञांना धीर देत आहेत.
पहाटे 4 - पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार
पंतप्रधान मोदी हे सकाळी 8 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत, असं ट्वीट इस्रोने केलं आहे.
 
रात्री 2.24 - देशाला तुमचा अभिमान आहे - मोदी
इस्रोच्या या घोषणेनंतर नरेंद्र मोदींनी वैज्ञानिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. "देशाला आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. त्यांनी सर्वस्व पणाला लावलंय. आता अशा क्षणाला गरज आहे धीर धरण्याची आणि आपण धीर धरू," असं शास्त्रज्ञांना उद्देशून मोदी म्हणाले.
 
ते इस्रोच्या बेंगळुरूस्थित मुख्यालयात देशभरातल्या काही निवडक शालेय विद्याथी तसंच सर्व वैज्ञानिकांबरोबर ही मोहीम पाहत होते. "इस्रोचे प्रमुख आपल्याला सर्व ताजी माहिती देतच राहणार. आम्ही अजूनही आशा सोडलेली नसून आपल्या अंतराळ कार्यक्रमावर आणखी जोमाने काम करणार."
 
रात्री 1.17 - मून लॅंडर विक्रमचा संपर्क तुटला, इस्रोकडून घोषणा
"विक्रम लॅंडर नियोजीत मार्गावरून उतरत होतं. (चंद्रभूमीपासून) 2.1 किमी दूर असेपर्यंत सारंकाही व्यवस्थित होतं. त्यानंतर लॅंडरचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटला. आम्ही आकड्यांचा आभ्यास करत आहोत," असं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं.
 
रात्री 2.00 - इस्रोच्या शास्रज्ञांमध्ये गहन चर्चा, सर्वजण घोषणेच्या प्रतीक्षेत
 
रात्री 1.55 - इस्रोच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली
रात्री 1.48 - मून लॅंडर विक्रमने धोक्याचा टप्पा पार केला
रात्री 1. 47 - मून लॅंडर विक्रमची चारही इंजिन्स प्रज्वलीत असल्याचं इस्रोकडून स्पष्ट
रात्री 1.42 - पुढच्या 6 मिनिटांमध्ये संपूर्ण वेग कमी करण्याचा प्रयत्न होणार
रात्री 1.40 - मून लॅंडर विक्रमचा वेग कमी करण्यात आला
 
रात्री 1.37 - मून लॅंडर विक्रमच्या उतरण्याची प्रक्रिया सुरू
रात्री 1.23 - नरेंद्र मोदी इस्रोत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगलुरूच्या इस्रोच्या सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. ते स्वतः तिथं उपस्थित राहून हे लँडिंग पाहाणार आहेत.
 
रात्री 1 - काउंडडाऊन सुरू
इस्रोच्या बेंगलुरूमधल्या केंद्रातून चांद्रयान-2च्या लँडिंगचे प्रक्षेपण सुरू. शेवटच्या तासाची प्रक्रिया सुरू.
 
रात्री 11 - इतिहास घडवण्यासाठी आम्ही सज्ज - इस्रो
इस्रोनं ट्वीट करून आम्ही इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे लँडिंग पाहाण्यासाठी इस्रोच्या बेंगलुरूतल्या केंद्रात उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासमवेत देशभरातले काही निवडक विद्यार्थी सुद्धा इथं उपस्थित राहणार आहेत.
 
'विक्रम' चंद्राच्या पृष्टभागावर उतरल्यानंतरच खरं मिशन सुरू होईल असं इस्रोनं म्हटलं आहे. इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या नावावरून मून लॅंडरला 'विक्रम' नाव देण्यात आलं आहे.
 
चांद्रयान-2 हे इस्रोच्या इतिहासातलं सर्वांत क्लिष्ट अभियान आहे असं इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी म्हटलं आहे.
प्रग्यान रोव्हर
या मिशनचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग हा 'प्रग्यान' रोव्हर आहे. सॉफ्ट लॅंडिंग झाल्यानंतर हे रोव्हर चंद्रावर 500 मीटरपर्यंत फिरणार आहे. या रोव्हरला सहा चाकं असतील. चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं हे या रोव्हरचं काम असेल असं इस्रोनं आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
 
याआधी काय घडलं?
22 जुलैपासून या चंद्रयानाचा प्रवास सुरू झाला.
 
चांद्रयान 2 यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलं आहे. 20 ऑगस्टपर्यंत चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. सध्या हे यान पृथ्वी ते चंद्र या टप्प्यात आहे, असंही इस्रोतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
हा प्रवास नेमका असतो तरी कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
 
22 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आलं होतं.
 
चांद्रयानाने पृथ्वीच्या कक्षेत अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू चंद्राच्या दिशेने रवाना झालं आहे. चांद्रयान 2 हळूहळू पृथ्वीपासून दूर जातं आहे आणि चंद्राच्या जवळ जातं आहे.
 
14 ऑगस्टला रात्री 2 वाजता चांद्रयान2ला एक जोरदार धक्का देण्यात आला आहे. ज्यामुळे चांद्रयान2चं रॉकेट प्रज्वलित झालं.
 
चांद्रयान2 मध्ये आधीपासूनच रॉकेट बसवण्यात आलं आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत असताना रॉकेटच्या साह्याने विशेष फायरिंग केलं जातं.
 
या फायरिंगला ट्रान्स लूनर इंजेक्शन म्हटलं जातं. याबरोबरीने 'लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी'चा उपयोग होतो आहे.
 
विज्ञानाचे जाणकार पल्लव बागला सांगतात की, जेव्हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने जातं तेव्हा जी वाटचाल केली जाते, त्याला लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी म्हटलं जातं.
 
ही प्रक्रिया किती कठीण?
हा टप्पा एका विशिष्ट कालावधीत पार केला जातो.
 
हे काम ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात कठीण आहे. सुरुवातीला पृथ्वीपासून 276 किलोमीटरचं अंतर निश्चित करावं लागतं. त्याचं उद्दिष्ट असतं 3.84 लाख किलोमीटर. तुमचं लक्ष्य असं हवं की योग्य दिशेत लक्ष्याचा वेध घेतला जाईल.
 
चांद्रयान2 च्या या प्रक्रियेत किती जोखीम आहे?
उपग्रह लॉन्च झाल्यापासून चंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सगळे टप्पे जोखीमेचे असतात, असं पल्लव बागला सांगतात. 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचणं आणि सॉफ्ट लँडिंग होणं अवघड अशी प्रक्रिया आहे.
 
योग्य ठिकाणी लक्ष्यभेद झाला नाही तर चांद्रयान2 चंद्राच्या जवळ जाऊनही दूर राहू शकतं.
 
चांद्रयान2च्या वेगाबाबत पल्लव बागला सांगतात की, आता यानाला प्रतितास 39 हजार किलोमीटरचा वेग देण्यात आला आहे. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर हा वेग कमी करण्यात येईल.
 
या वेगाचं आकलन एका उदाहरणाने करून घेऊया. या वेगाने तुम्ही एका तासात काश्मीरहून कन्याकुमारीला सहा वेळा जाऊ शकता.
 
चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर ऑर्बिटरपासून वेगळं होईल.
 
शेवटच्या टप्प्यात चांद्रयान2 सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.
 
'विक्रम'ला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे, जेणेकरून रोवरचं नुकसान व्हायला नको.
 
रोवरचं नाव प्रज्ञान आहे. ते सहा पायांचं रोबोटिकल व्हेईकल आहे. जे चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन फोटो काढण्याचं काम करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती