मोदींची सोलो संजीवनी बुटीः पंतप्रधानांनी उल्लेख केलेली लडाखमधील वनस्पती

शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (09:52 IST)
रिगझिन नामग्याल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 ऑगस्टला देशाला उद्देशून भाषण केलं, तेव्हा ते काय म्हणतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.
 
मोदींनी त्यांच्या भाषणात जम्मू-काश्मीरसाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख केला आणि यामुळे राज्यातल्या लोकांना कसा फायदा होणार आहे, हेसुद्धा सांगितलं.
 
लडाखविषयी बोलताना त्यांनी एका वनस्पतीचं नाव घेतलं, तिचा 'संजीवनी बुटी' असा उल्लेख केला.
 
मोदींनी म्हटलं,"लडाखमध्ये 'सोलो' नावाची एक वनस्पती आहे. जाणकार सांगतात की, जास्त उंचीवरच्या आणि बर्फाच्छादित प्रदेशातील सुरक्षारक्षकांसाठी ही वनस्पती संजीवनी म्हणून काम करते. कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्याची काम ही वनस्पती करते."
 
"अशी वनस्पती जगभरात पोहोचायला हवी की नको? अशा अनेक वनस्पती जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आहेत. या वनस्पतींची विक्री झाली, तर तिथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे मी देशातील उद्योजक आणि अन्न उत्पादकांना आवाहन करतो की, जम्मू-काश्मीर आणि लढाखमधील स्थानिक वस्तूंना जगभरात पोहोचवण्यासाठी पावलं उचलावीत," ते पुढे म्हणाले.
 
सोलो वनस्पती काय आहे?
सोलो नावाची ही औषधी वनस्पती लडाखमध्ये आढळते. याशिवाय सायबेरियाच्या पर्वतरांगातही या वनस्पतीचं अस्तित्व आहे.
 
या वनस्पतीमध्ये बरेच औषधी गुण आहेत, असं Defence Institute of High Altitude and Research (DIHAR)चे संचालक डॉ. ओ.पी. चौरसिया सांगतात.
 
"भूक लागत नसेल, तर ती समस्या या वनस्पतीमुळे दूर करता येऊ शकते. तसंच यामुळे स्मृती तल्लख होते. इतकंच नाही तर सोलोचा वापर डिप्रेशनवर औषध म्हणूनही केला जातो," असं चौरसिया सांगतात.
 
सोलो वनस्पती 15 ते 18 हजार फूट उंचीवर आढळते. लडाखमध्ये ही वनस्पती खारदुंग-ला, चांगला और पेझिला या प्रदेशात आढळते.
 
लडाखमधील स्थानिक लोक या वनस्पतीपासून एक पदार्थ बनवतात, याला स्थानिक भाषेत तंगथुर म्हटलं जातं.
 
लडाखमध्ये हा पदार्थ लोकप्रिय आहे आणि आरोग्य उत्तम राहावं, तिचं सेवन केलं जातं.
 
डॉ. चौरसिया सांगतात, "सोलो वनस्पतीच्या तीन प्रजाती प्रामुख्यानं आढळतात. यात सोलो कारपो (पांढरा), सोलो मारपो (लाल) आणि सोलो सेरपो (पिवळा) समावेश होतो."
 
भारतात लडाख हे एकमेव ठिकाण आहे, जिथं सोलो वनस्पती आढळते. लडाखमधील स्थानिक वैद्य आणि डॉक्टर या वनस्पतीचा वापर करून औषधी बनवतात. यासाठी प्रामुख्यानं सोलो कारपोचा वापर केला जातो.
 
सोलो वनस्पतीचं वैज्ञानिक नाव रोडियाला (Rhodiola) आहे. DIHARमध्ये गेल्या 10 वर्षांपासून या वनस्पतीवर संशोधन सुरू आहे. यासोबतच या वनस्पतीच्या व्यावसायिकरणाबाबतही विचार सुरू आहे.
 
पर्यायी औषधांवर संशोधन करणारी अमेरिकेची सरकारी संस्था National Centre for Complimentary and Integrative Health (NCCIH)नुसार, "सोलो वनस्पतीवर काही संशोधन झालं आहे. त्यानुसार, या वनस्पीच्या सेवनानं मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते, असं समोर येतं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती