काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुरूवार, 7 मार्च 2024 (23:11 IST)
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (६, मार्च) मंत्रालयाबहेर आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १७ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मंत्रालयाबहेर आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १७ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आंदोलनादरम्यान सरकार आणि एस बी आय विरोधात घोषणाबाजी करणे तसेच जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढल्याबद्दल काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वर्षा गायकवाड यांच्यासह एकूण ६०-७० आंदोलकांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना मोर्चा काढणे, जमावबंदी आदेशाच उल्लघन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेस तडा जाईल असे कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती