संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

शुक्रवार, 20 जून 2014 (12:10 IST)
विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि भाविकांचा उत्साह, अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संत तुकोबारायांच्या   पालखी सोहळने पंढरपूरसाठी गुरुवारी प्रस्थान ठेवले. तर 20 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

इंद्राणीचा सारा परिसर गेले काही दिवसांपासून भाविकांमुळे आणि राज्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या दिंड्यांमुळे फुलून गेला आहे. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. प्रशासनाने सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजता मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात महापूजा झाली. त्यापूर्वी घंटानाद करण्यात आला. त्यानंतर साडेपाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा झाली. नंतर श्री नारायण महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी नऊ वाजता देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी इनामदार वाडय़ात पादुकांची महापूजा झाली.

दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. सुरुवातीला ज्येष्ठ भाविकांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्निक पादुकांची पूजा केली. यावेळी देहू संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. पादुका जेव्हा पालखीमध्ये  ठेवल्या त्यावेळी भाविकांनी हरिनामाचा गजर केला. टाळ मृदंगाचा जयघोष झाला. वातावरणात उत्साह निर्माण झाला. सारा परिसर दुमदुमून गेला होता. साडेचारच्या सुमारास पालखी सोहळा मंदिरातून निघाला. गुरुवारी पालखी सोहळचा मुक्काम प्रदक्षिणा झाल्यावर इनामदार वाडय़ात असणार आहे. आज पालखी सोहळा पुढील मुक्कामसाठी आकुर्डी येथे येणार आहे. हा 329 वा पालखी सोहळा आहे.

पालखी सोहळसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणत आला आहे. त्याचप्रमाणे भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी ठिकठिकाणी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.   

वेबदुनिया वर वाचा