मुख्यमंत्रिपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार?

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (11:43 IST)
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण बहुत मिळेल आणि जर त्या सरकारचे नेतृत्व करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आमचे नेते शरद पवार यांनी जर पूर्ण केली तर आम्हा सर्वाना आनंदच होईल अशा शब्दात येणार्‍या नव्या सरकारचे नेतृत्व शरद पवार करू शकतील असे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचित केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्तालाप मालिकेत ते बोलत होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षाची आघाडी काँग्रेस पक्षाच्या आडमुठेपणामुळेच तसेच त्या पक्षाने सभ्यता पाळली नाही म्हणून समाप्त झाली असेही प्रतिपादन तटकरे यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण संकुलात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याच्या सर्व विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाची गरज लागणार नाही असे सांगून एका प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले की आमचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पूर्वी असे म्हटले होते की ते केंद्रातच राहू इच्छितात हे खरे आहे. पण राज्यातील बदलत्या स्थितीत त्यंनी जर पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास संमती दिली तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यात नक्कीच आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षात राज्यातील मंत्र्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीक दिली, मंत्रिमंडळात फारसे बदल न झाल्यामुळे नेतृत्व घडण्याची संधीही मिळाली, दुसर्‍या फळीचे नेते घडले. पण तरीही काही एक-दोन नेते निवडणुकीवेळी अन्य पक्षात गेले तो त्यांचा पळपुटेपणाच आहे. एक-दोन लोक गेल्यामुळे फारसा (पान पाच पाहा) फरक आमच्या पक्षाला पडणार नाही, असे तटकरे म्हणाले.
 
नारायण राणेंच्या कुडाळमध्ये तसेच माजी मुख्यमंत्र्यांच्या कर्‍हाड मतदारसंघात आमचे तसेच आम्ही समर्थन दिलेले नेते जोरदार लढत देत आहेत असे सांगून सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर आता चार महिन्यांचा काळ गेला आहे, तसेच सर्वच पक्ष निराळे लढत असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय स्थिती राज्यात पंधरा दिवसात बदलली आहे. प्रत्येक तालुक्यातील स्थिती निराळी आहे. कुठे आमचा सामना शिवसेना वा भाजपबरोबर आहे तर कुठे आमची लढत काँग्रेसबरोबरही आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शैलीवर तसेच कार्यपद्धतीवर तटकरे यांनी टीका केली. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सहाजिकच वेळेची मर्यादा होती तरीही काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद येत नव्हता म्हणून आमची आघाडी होत नाही हे स्पष्ट झाले. 

वेबदुनिया वर वाचा