हॅपी बर्थ डे राणी

IFM
21 मार्च 1978 मध्ये जन्मलेली राणी मुखर्जी आज तिशी पूर्ण करून ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

सध्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणार्‍या राणीने करियरची सुरुवात 'राजा की आएगी बारात' या चित्रपटाने केली होती. या बी-ग्रेडच्या चित्रपटाने बर्‍यापैकी व्यवसाय केला होता.

साधारण चेहरा असणार्‍या राणीच्या घोगर्‍या आवाजावर लोकांनी बरीच टीका केली होती. पण राणीने त्याकडे दुर्लक्ष करीत बी-ग्रेडमधून ए-ग्रेडच्या चित्रपटांपर्यत धाव घेतली. तिला नशिबानेही साथ दिली.

विक्रम भट्ट आमीरला घेऊन 'गुलाम' बनवीत होते. नायिका म्हणून पूजाची निवड करण्यात आली होती. मात्र आमीरला पूजा भट्ट त्या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही. त्यामुळे पूजा भट्टला बाहेरचा रस्ता दाखवून अंतिम क्षणी राणीला सामील केले गेले.

त्याच दरम्यान करण जौहर 'कुछ कुछ होता है' चित्रपट करायची योजना आखीत होता. काजोल व्यतिरिक्त अजून एका नायिकेची गरज होती. बर्‍याच अभिनेत्रींना या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काजोलशी सामना करण्यास कोणीही तयार नव्हते.

शेवटी चित्रपटात राणी मुखर्जीला घेण्यात आले. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी तिकिट खिडकीवर जबरदस्त यश मिळविले होते. 'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलसारख्या अभिनयात निपूण असलेल्या अभिनेत्रीसमोर ती कुठेच कमी पडली नाही. या चित्रपटात आत्मविश्वासाने वावरून तिने आपली पुढची चाल नक्की केली.

तिच्या सौंदर्याची आणि आवाजाची टीका करणारेही मग तिची तोंडभरून स्तुती करू लागले. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर राणीने मागे वळून पाहिलेच नाही. एक स्टार असण्यासोबतच ती सशक्त अभिनेत्रीही आहे ही गोष्ट तिने तिच्या अभिनयातून सिद्ध केली. सर्वश्रेष्ठ अभिनयासाठी तिने बरेच पुरस्कार पटकावले.

शाहरुख आणि सलमानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. बॉलीवूडच्या सर्वश्रेष्ठ दिग्गज आणि दिग्दर्शकांसमवेत तिने काम केले. 'ब्लॅक' या चित्रपटात तर तिने अभिनयातील नवी उंची गाठली. सध्या राणी कमीत कमी चित्रपट आणि उत्कृष्ट चित्रपट करण्यावर भर देत आहे.

राणीला मिळालेले पुरस्कार :
1) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (1998) - फिल्मफेयर पुरस्कार : कुछ कुछ होता है
2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) (2002) - फिल्मफेयर पुरस्कार : साथियां
3) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2004) - जी सिने अवार्ड : हम तुम
4) सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री (2004) - फिल्मफेयर पुरस्कार : युवा
5) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2004) - फिल्मफेयर पुरस्कार : हम तुम
6) सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री (2005) - स्क्रीन पुरस्कार : युवा
7) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2005) - जी सिने अवॉर्ड : हम तुम
8) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2005) - जी सिने अवॉर्ड : ब्लैक
9) सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री (2005) - आयफा अवॉर्ड : वीर झारा
10) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2005) - आयफा अवॉर्ड : हम तुम
11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) (2005) - फिल्मफेयर पुरस्कार: ब्लैक
12) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2005) - फिल्मफेयर पुरस्कार : ब्लैक
13) जोड़ी नंबर वन (2006) - स्क्रीन अवॉर्ड : बंटी और बबली
14) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2006) - स्क्रीन अवॉर्ड : ब्लॅक
15) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (2006) - आयफा अवॉर्ड : ब्लॅक

वेबदुनिया वर वाचा