भारतीय शटलर आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने शनिवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा पराभव करून मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत बुसाननचा 13-21, 21-16, 21-12 असा पराभव केला. 2023 च्या स्पेन मास्टर्सनंतर स्पर्धेतील सिंधूची ही पहिलीच अंतिम फेरी आहे.
सिंधूने पहिला सेट 13-21 असा गमावला, पण पुढच्या दोन सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय शटलरने शेवटच्या दोन सेटमध्ये 21-16 आणि 21-12 असे वर्चस्व राखले. रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय शटलरचा सामना चीनच्या वांग झियाशी होणार आहे.
सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या हान यू हिचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने 55 मिनिटे चाललेल्या लढतीत तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्याचा 13-21, 21-14 आणि 12-21 असा पराभव केला.
मलेशिया मास्टर्स 21 ते 26 मे दरम्यान क्वालालंपूर, मलेशिया येथे होत आहे. ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड टूर सुपर 500 स्तरीय स्पर्धा आहे. पीव्ही सिंधूने 2013 आणि 2016 मध्ये दोनदा या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे, तर सायना नेहवालने 2017 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. एचएस प्रणॉयने गतवर्षी पुरुष एकेरीचे विजेतेपदही चीनच्या वांग होंगयांगला 21-19, 13-21, 21-18 असे पराभूत करून जिंकले होते.