भारताने 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानचा वर्गीकरण फेरीच्या पहिल्या सामन्यात 8-0 असा पराभव केला. जे आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकले नाहीत ते 9व्या ते 16व्या स्थानासाठी संघर्ष करत आहेत. या फेरीतील भारताचा पहिला सामना जपानविरुद्ध होता. राउरकेला येथे झालेल्या सामन्यात भारताने जपानचा 8-0 असा धुव्वा उडवला.
हाफ टाईम 0-0 असा स्कोअर होता. दुसऱ्या हाफमध्ये म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने गोल केले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेकने प्रत्येकी दोन गोल केले. तर मनदीप सिंग, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग आणि सुखजित सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच भारताने जपानविरुद्ध प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. याचा फायदा टीम इंडियाला 32व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा मनदीप सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. अशाप्रकारे भारतीय संघ १-० ने पुढे गेला. तीन मिनिटांनंतर म्हणजेच 35व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी दुसरा गोल केला. यानंतर 39व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने पेनल्टी कॉर्नरवर रिबाऊंडवर स्ट्रोक करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. अभिषेकने सामन्यातील दुसरा आणि भारतासाठी चौथा गोल ४३व्या मिनिटाला केला.