Asian Games 2023: 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी संघाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशाला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदके जिंकली होती, मात्र सुवर्णपदकांची यादी रिकामीच होती. नेमबाजी संघाने सोमवारी सुवर्ण सुरुवात करून देशाला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले आणि विश्वविक्रमही केला.
पुरुषांच्या 10 मीटर नेमबाजी संघामध्ये रुद्राक्ष बाळासाहेब पाटील,दिव्यांशसिंग पवार आणि ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर. भारतीय त्रिकुटाने हांगझोऊमध्ये इतिहास रचला. वैयक्तिक पात्रता फेरीत, भारतीय त्रिकुटाने एकूण 1893.7 गुण मिळवले आणि जागतिक विक्रम मोडला. याआधी नेमबाजी सांघिक स्पर्धेत सर्वाधिक धावा चीनच्या नावावर होत्या. चीनच्या खेळाडूंनी गेल्या महिन्यात बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 1893.3 गुण मिळवले होते. भारतीय संघाने चीनपेक्षा 0.4 गुण अधिक मिळवले आहेत.
क्वालिफिकीकेशनमध्ये तिसऱ्या स्थानावर रुद्राक्ष 632.5 गुणांसह संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. ऐश्वर्य 631.6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर दिव्यांशने 629.6 गुण मिळवले. कझाकस्तानच्या इस्लाम सत्पायेवपेक्षा जास्त इनर 10 असल्यामुळे तो कट करण्यात यशस्वी झाला. तिन्ही भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते, परंतु नियमांनुसार एका देशाचे दोनच खेळाडू अंतिम फेरीत सहभागी होऊ शकतात. अशा परिस्थितीत दिव्यांशला बाहेर पडावे लागले. आता रुद्राक्ष आणि ऐश्वर्यकडूनही वैयक्तिक पदकांची आशा आहे.