मुंबई- प्रो-कबड्डीच्या दुसर्या पर्वाचे जेतेपद अनूप कुमारच्या यू मुम्बाने पटकावले आहे. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या लढतीत मुंबईने बंगळुरू बुल्सवर 36-30 ने मात केली आणि दुसर्या मोसमाचा शेवटही गोड केला.
यू मुंबाच्या या विजयात शब्बीर बापू, अनूप कुमार, विशाल माने आणि रिषांक देवाडिगानं महत्त्वाची भूमिका बजावली. शब्बीर बापूनं चढाईत 9 आणि पकडीत एक अशी एकूण दहा गुणांची कमाई केली.
अनूप कुमारनं सात गुण मिळवले. त्यात विशाल माने आणि रिषांक देवाडिगानंही प्रत्येकी पाच गुणांची भर घातली आणि यू मुम्बाच्या विजयाला हातभार लावला. बंगळुरूकडून कर्णधार मनजीत चिल्लरनं 11 गुण मिळवून यू मुम्बाला कडवी टक्कर दिली.