ऑस्ट्रेलियन खुली टेनिस

मंगळवार, 20 जानेवारी 2015 (15:32 IST)
रफाएल नदालसह ब्रिटनच्या अँण्डी मरेने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देऊन दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. मात्र, ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे अँना इवॅनोविकचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले.
 
थंड वार्‍यांच्या वातावरणात सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नदालने रशियाच्या मिखाईल याऊझ्नीवर ६-३, ६-२, ६-२ असा तीन सरळ सेटमध्ये विजय मिळवला. दुखापतीतून तंदुरुस्त होऊन टेनिस कोर्टवर पुनरागमन केलेल्या नदालची गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरी निराशाजनक होती. पण सोमवारी मात्र त्याने आपल्या कीर्तीला साजेसा खेळ केला. १४ ग्रॅण्ड स्लॅम जिंकणार्‍या नदालने सामन्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली की, माझ्या दृष्टीने पहिला सामना फारच महत्त्वाचा होता. सामन्यासाठी कोर्टवर उतरण्यापूर्वी माझ्या मनात अनेक संशय निर्माण झाले होते; पण प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली आणि माझा खेळ बहरला.
 
माजी विम्बल्डन विजेत्या अँण्डी मरेला भारताच्या युकी भाम्ब्रीवर विजय मिळवताना घाम गाळावा लागला. या स्पर्धेच्या विजेतेपदाने अँण्डी मरेला तीनदा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा जेतेपद पटकावणे, हेच त्याचे ध्येय आहे. ब्रिटनच्या अव्वल टेनिसपटूने युकी भाम्ब्रीवर ६-३, ६-४, ७-६ (७/३) असा विजय मिळवला. नव्या प्रशिक्षक अँमेली मॅरिस्तोच्या मार्गदर्शनाबद्दल मरेने समाधान व्यक्त केले. इतर झालेल्या सामन्यांत सिमोना हॅलेपने इटलीच्या करीन नॅपवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला. रुमानियाच्या सिमोनाने गतवर्षी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. गतवर्षी तीने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत तर विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. दहाव्या मानांकित ग्रिगॉर डिमिट्रॉवनेही दुसर्‍या फेरीत प्रवेश करताना र्जमनीच्या डस्टीन ब्राऊनला ६-२, ६-३, ६-२ असे नमवले.महिलांच्या गटात पाचव्या मानांकित अँना इवॅनोविकला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा झटका बसला. २0१४ साली झकास कामगिरी करून महिला टेनिस विश्‍वक्रमवारीत बढती मिळालेल्या इवॅनोविकने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पण विश्‍वक्रमवारीत १४२व्या स्थानावरील झेक प्रजासत्ताकच्या लुसी हॅडेकाने तिचा १-६, ६-३, ६-२ असा पराभव केला.

वेबदुनिया वर वाचा