साहित्य : एक लिटर दूध, एक वाटी मलईचे दही, गूळ, वेलदोड्यांची पूड.
कृती : सायीसकट दुधाला विरजण लावलेले गोड दही घ्यावे. दूध तापत ठेवून, ते अर्धा लिटर होईल, इतके बासुंदीप्रमाणे आटवावे. नंतर त्यात वरील मलईचे दही घालावे. आटवलेले दूध नासल्यासारखे होईल. तसे नासलेले दूध तसेच आटवत ठेवावे. पाणी आटत आल्यावर गूळ (चिरून घेऊन) घालावा व पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईपर्यंत पुन्हा आटवावे. नंतर त्यात वेलदोड्यांची पूड घालावी. हा पदार्थ वाटीमध्ये तसाच खावयास देतात किंवा लाडवासारखा गोल वळूनही देतात.
टीप : मद्रासी लोक तेरटी पालमध्ये गूळच घालतात. आपण साखर घालण्यासाही हरकत नाही. वेलदोड्यांच्या पुडीऐवजी जायफळाची पूडही घालण्यास हरकत नाही.