आपल्याकडे श्रावण शुद्ध पंचमी हा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. वास्तविक जुन्या धार्मिक ग्रंथात नागपंचमीच्या सणाबद्दल काहीही संदर्भ कथा आढळत नाही. मात्र नागमाहिमा सांगणार्या अनेक लोककथा भारतभर उपलब्ध आहेत. आर्य प्राचीन काळापासून नागपूजा करीत, असे अनेक संदर्भ मिळतात.
गृहस्थाश्रमी पुरुष जी धार्मिक गृहकृत्ये करतो त्याला गृह्यविधी म्हणत. गौतमनामक एका सूत्रकाराने आपल्या गृह्यसूत्रात या विधींबद्दल सविस्तर सांगितले आहे. या ४० गृह्यविधींपैकी जे सात पाकयज्ञ केले जात, त्यापैकी श्रावणी नामक पाकयज्ञ हा श्रावण पौर्णिमेला नागांसाठी केला जाई. सापांपासून आपले कुटुंब सुरक्षित राहावे ही त्यामागची श्रद्ध असे. पुढे पौर्णिमेला हा पाकयज्ञ जाऊन त्याऐवजी पंचमीला दूधलाह्यांचा नैवेद्य दाखविण्याची रुढी प्रचलित झाली. आता पौर्णिमेला केली जाणारी श्रावणी आणि नागांचा काहीही संबंध उरलेला नाही. गृह्यसूत्रात मात्र श्रावण पौर्णिमेला स्वर्ग, आकाश व पृथ्वी या तिन्ही ठिकाणच्या सर्पांची पूजा करावी असे म्हटले आहे. आपले भगवान विष्णू हे तर शेषाच्या गुबगुबीत शय्येवर चार महिने कसे गाढ झोप घेतात.
भगवान शंकरांनी आणि त्यांच्या पुत्राने म्हणजे गणपतीने तर सर्पांना आपल्या अंगाखांद्यावर आभूषणे म्हणून स्थान दिले आहे. शिवकवचस्तोत्रात शिवशंकराला नागेंद्रकुंडल, नागेंद्रहार, नागेंद्रवलय इत्यादी विशेषणांनी संबोधिले आहे. नागेश असे महादेवाचे एक नाव आहे. कश्यप आणि कद्रु यांचे अनंत, वासुकी, तक्षक, कर्केटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिप हे आठ पुत्र अष्टनाग म्हणूनच प्रसिध्द आहेत. त्यापैकी काही नाग हे देवांना आणि मानवांना अनुकूल ठरले तर काही शत्रू ठरले. अनंत, वासुकी, शेष हे अनुकूल तर कर्केटक, कालिया हे प्रतिकूल ठरले. ज्यांच्यावर नागाने लहानपणी छत्र म्हणून फणा धरली ते पुढे राजे झाले. भगवान श्रीकृष्ण हे त्यापैकीच एक.
बोधगयेसह अनेक ठिकाणी बुद्धाच्या जोडीने सर्पांच्या आकृत्याही कोरलेल्या आढळतात. भगवान बुद्धाच्या मस्तकावर नागफणी असलेली सुवर्णमूर्ती बुद्धस्तूपांना अर्पण करण्याची चाल ब्रह्मदेशात आहे. बौद्धश्रमण हे नागांची पूजा करीत, असे वर्णन चिनी प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनात केले आहे. नागाशी संबंधित अनेक व्रते वर्षभर कुठे ना कुठे केली जातात. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी म्हणतात. या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. आपल्या घरात जितके पुरुष असतील त्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकेक पक्वान्न करुन त्यावर एकेक दिवा लावायचा, ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात विशेष प्रचलित होती. नाग हे मूळ पुरुषाचे प्रतिक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतिक. मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्व हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा भक्तिभाव. सेंट फ्रान्सिस जंगलात साप दिसला की प्रेमाने त्याला जवळ बोलावीत. ते सापही त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत. विशेष म्हणजे ख्रिस्तीधर्मात सापाला पूज्य स्थान नाही, उलट सैतान समजले गेले आहे. मलबारी लोक नागाला त्वचेच्या रोगांचा देव समजतात. मुळात आपण संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर पेलली आहे असे मानतो. समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नामक सर्पाचा दोरीप्रमाणे उपयोग केला होता. अशा रीतीने नागांबद्दलचे मानवाचे भीतीयुक्त प्रेम दर्शविणारे नागपूजनाचे विविध विधी भारतात नानातर्हेने वेगवेगळ्या दिवशी करण्याची पूर्वापार प्रथा आहे. आपल्या परंपरांगत श्रद्धेत नागांना विशिष्ट स्थान आहे. कुळाचा मूळपुरुष नागरुपात वावरुन कुळाचे रक्षण करतो, तसेच गुप्तधनाची राखणही नाग करतो.
अशा अनेक श्रद्धा-समजुती पिढय़ान् पिढय़ा चालत आल्या आहेत. म्हणूनच धर्मसंस्कृतीचे देवदेवतार्चनातही नागपूजन सामावून घेतले आहे. विविध प्रांतात नागपूजनाचे म्हणून जे विविध दिवस मानले गेले आहेत, त्यामधीलच आपली ही नागपंचमी..