रशियाने युक्रेनविरोधात उत्तर कोरियाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं वापरली- अमेरिकेचा दावा
शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (11:25 IST)
रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धात उत्तर कोरियातर्फे पुरवण्यात आलेली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि लाँचर्सचा वापर केलाय, असं अमेरिकेने म्हटलंय.
प्योंगयांगची ही रशियाच्या समर्थनाशी संबंधित असणारी बाब “महत्त्वपूर्ण आणि चिंता वाढवणारी” असल्याचं नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले.
ते म्हणाले की, 'अमेरिका या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आवाज उठवेल आणि शस्त्रास्त्र हस्तांतरणासाठी काम करणाऱ्यांवर अतिरिक्त निर्बंध लादेल.'
मॉस्कोने असा कोणताही करार झाला नसल्याचं त्यांनी पुढे म्हटलंय.
व्हाईट हाऊसने आरोप केल्याच्या काही तासांनंतर लगेचच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांनी देशात क्षेपणास्त्र प्रक्षेपण वाहनांचं उत्पादन वाढविण्याचं आवाहन केलं.
संभाव्य लष्करी सहकार्यावर चर्चा करण्यासाठी उत्तर कोरियाच्या प्रमुखांनी सप्टेंबरमध्ये रशियाला भेट दिली होती.
अमेरिकेने यापूर्वी देखील उत्तर कोरियाने रशियाला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केलाय, परंतु यावेळी पहिल्यांदा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांबद्दल तपशील सार्वजनिक केला आहे.
900 किलोमीटर (500 मैल) दूर लक्ष्यापर्यंत मारा करू शकणारे स्वयंचलित रॉकेट, पुरवल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
गुरुवारी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत बोलताना मिस्टर किर्बी म्हणाले की, 'रशियाने उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची केलेली खरेदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या असंख्य ठरावांचं थेटपणे केलेलं उल्लंघन आहे.'
“रशियाला पुन्हा एकदा त्यांच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जबाबदार धरण्याची आम्ही मागणी करू,” असंही ते म्हणाले.
रशिया इराणकडून नजिकच्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याची योजना आखतंय, परंतु त्यांनी अद्याप तसं केलेलं नाही, असंही ते म्हणाले.
रशियाने उत्तर कोरियाकडून घेतलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा युक्रेनवर वापर केल्याचा इंग्लंडने “तीव्र निषेध” नोंदवलाय.
"उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लागू आहेत आणि युक्रेनमधील रशियाच्या बेकायदेशीर युद्धाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर कोरियाला मोठी किंमत मोजावी लागेल यासाठी आम्ही आमच्या सहकारी देशांसोबत काम करत राहू.”, असं परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं.
आपल्या निवेदनात मिस्टर किर्बी यांनी युक्रेनसाठी “क्षणाचाही विलंब न करता" अतिरिक्त अमेरिकन निधी मंजूर करण्याची अमेरिकन काँग्रेसला विनंती केली.
“युक्रेनियन लोकांविरुद्ध रशियाच्या भीषण हिंसाचाराला सर्वात प्रभावी प्रतिसाद म्हणजे युक्रेनला आवश्यक हवाई संरक्षण क्षमता आणि इतर प्रकारची लष्करी उपकरणं पुरवत राहणं ही आहे,” असं ते म्हणाले.
"इराण आणि डीपीआरके [उत्तर कोरिया] यांचा रशियाला पाठिंबा आहे. युक्रेनियन्सना हे माहित असणं गरजेचं आहे की अमेरिकन लोकं आणि हे सरकार त्यांच्या पाठीशी कायम उभं राहिल."
व्हाईट हाऊसने युक्रेनसाठी सुमारे 250 मिलियन डॉलरचं शेवटचं अमेरिकन लष्करी मदतीचं पॅकेज 27 डिसेंबर रोजी मंजूर केलेलं.
रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नसल्यामुळे काँग्रेसमध्ये पुढील निधीची चर्चा थांबली आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की यूएस-मेक्सिको सीमेवर कठोर सुरक्षा उपायोजना करणं हा कोणत्याही लष्करी मदतीच्या कराराचा भाग असणं गरजेचं आहे.
युक्रेनने इशारा दिलाय की पाश्चात्य देशांकडून जर पुढील मदत लवकर मिळाली नाही तर त्यांचे युद्ध प्रयत्न आणि देशाची आर्थिक घडी विस्कटेल.