रशिया-युक्रेन संघर्ष : युरोपावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं शरणार्थी संकट - संयुक्त राष्ट्र

रविवार, 6 मार्च 2022 (10:27 IST)
रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धामुळे युरोपवर दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं शरणार्थी संकट ओढवलं आहे, असं UN म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.
 
या युद्धानंतर युक्रेनमधून पलायन करून येणाऱ्या शरणार्थ्यांची संख्या लवकरच 15 लाखांपर्यंत जाऊ संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्थेने (UNHCR) रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे युरोपमधलं सर्वात मोठं शरणार्थी संकट आहे.
 
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर सुमारे 13 लाख नागरिक आपलं घर सोडून पळून गेले आहेत.
 
पोलंड देशाच्या प्रशासनाने आतापर्यंत अर्ध्या शरणार्थ्यांना आपल्या देशात घेतल्याचा दावा केला. तर हंगेरी आणि रोमानिया या देशांमध्येही खूप शरणार्थी आले आहेत.
पण सर्व शरणार्थ्यांना याच देशांमध्ये आश्रय हवा असं नाही. रोमानियात पहिल्या 8 दिवसांत 2 लाख लोक दाखल झाले होते. तिथून जवळपास 1 लाख 40 हजार नागरिक इतर देशांमध्ये निघून गेले. तिथं आता फक्त 60 हजार नागरिकच उरले आहेत.
 
शस्त्रसंधीची घोषणा करूनही रशियाकडून बॉम्बवर्षाव, युक्रेनचा आरोप
मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली होती. पण तरीसुद्धा रशियाकडून मारियुपोलमध्ये बॉम्बवर्षाव सुरूच आहे, असा आरोप युक्रेनने केला आहे.
 
रशियाकडून बॉम्बवर्षाव सुरुच असल्यामुळे नागरिकांना येथून बाहेर काढण्याचं काम थांबवण्यात आल्याचं मारियुपोल प्रशासनाने म्हटलं आहे.
 
रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाचा आज दहावा दिवस आहे. दरम्यान, आज (5 मार्च) रशियाने युक्रेनच्या दोन शहरांमध्ये तात्पुरत्या शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांमधील युद्ध आपण थांबवत असल्याचं रशियाने म्हटलं होतं.
या शहरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी वाहनांची सोय करण्यात येईल, अंदाजे 7 ते 9 हजार नागरिक मारियुपोलमधून बाहेर पडू शकतील, असं येथील महापौरांनी म्हटलं होतं.
 
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रशियन सैन्य मॉस्कोच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता या दोन शहरांवरील हल्ले थांबवणार आहे. लोकांची मदत करण्यासाठी तसंच मानवी कॉरिडोर खुलं करण्यासाठी (लोकांना शहराबाहेर पडण्याकरिता) काही काळ रशियाकडून युद्ध थांबवण्यात येईल.
 
युक्रेनच्या बहुतांश भागात बिकट परिस्थिती ओढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना रशियाकडून या तात्पुरत्या शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.
 
युदधात होरपळलेल्या शहरांमध्ये प्रामुख्याने राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी, चेर्निगोव्ह आणि मारियुपोल शहरांचा समावेश आहे.
 
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सहयोगी मिखाईल पोदोलियाक यांनी म्हटलं की सुमारे 2 लाख नागरीक मारियुपोलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. तसंच 20 हजार नागरिकांना दोनेत्स्क भागातील वोल्नोवाखा परिसर सोडायचा आहे.
 
सद्यस्थितीत युक्रेनचे दोन सर्वात मोठे बंदर मानल्या जाणाऱ्या मारियुपोल आणि वोल्नावाखा या दोन शहरांना रशियन सैन्याने घेराव घातलेला आहे. या शहरांवर हल्ले सुरू आहेत.
तत्पूर्वी, रशियन सैन्याच्या नाकाबंदीदरम्यान सामान्य नागरिकांना शहर सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती मारियुपोलच्या महापौरांनी केली होती. इतर ठिकाणी लढाई सुरू राहील, असं ते म्हणाले होते.
 
खारकीव्हमध्ये अजूनही काही ठिकाणी स्फोटांचा आवाज ऐकायला मिळत आहे. पूर्वेकडील सुमी शहरात स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाचपासूनच हल्ले सुरू आहेत.
 
आतापर्यंत काय काय घडलं?
रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली, त्याला आज 10 दिवस पूर्ण होत आहेत. रशिया-युक्रेनमधील हा संघर्ष दिवसागणिक अधिक गंभीर रूप घेताना दिसत आहे.
 
आधी केवळ प्रशासकीय आणि लष्करी तळांवर हल्ले करत आलेल्या रशियानं आता रहिवासी भागात हल्ले केल्याचा आरोप होत आहे.
 
तसंच, युरोपातील सर्वात मोठ्या झपोरिझझिया अणूऊर्जा प्रकल्पावरही हल्ला केल्यानं संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, या हल्ल्यामुळे प्रकल्पातील काही रिअॅक्टर्सनं लागलेली आग आटोक्यात आल्यानं अनेकांचा जीव भांड्यात पडला.
 
दुसरीकडे, आज किंवा उद्यामध्ये, म्हणजे शनिवार-रविवारमध्ये रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा एकदा चर्चेची फेरी होण्याची शक्यता आहे.
'ही तर युक्रेनच्या उद्ध्वस्तीकरणाला मंजुरी'
ब्रझेल्समध्ये नेटो देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर असं ठरवलं की, युक्रेनच्या हवाई क्षेत्रात 'नो फ्लाय झोन'ची घोषणा केली जाणार नाही.
 
नेटोच्या या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी नाराजी व्यक्त केलीय.
नेटोच्या नेतृत्वाने युक्रेनच्या शहरं आणि गावांच्या उद्ध्वस्तीकरणाला मंजुरी दिलीय, अशा शब्दात झेलेन्स्कींनी नेटोवर टीका केलीय.
 
युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका - झेलेन्स्की
युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, असं म्हणत युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नेटो सदस्यांपुढे मदतीची याचना केलीय.
 
तर 'नो फ्लाय झोन' बनवण्यास नेटो तयार नसल्याचं पाहून, झेलेन्स्कीनं टीकेची झोड उठवलीय. नेटोचं नेतृत्वानं यु्क्रेनमधील शहरं आणि गावांच्या उद्ध्वस्तीकरणाला मंजुरीच दिलीय, अशी हतबलता झेलेन्स्कींनी व्यक्त केलीय.
 
झेलेन्स्कींच्या घराबाहेर क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळ सापडलेले अवशेष हे क्षेपणास्त्राचे असण्याची शक्यता असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.
हे झेलेन्स्कींचं सेकंड होम आहे. सर्गेई नायकीफोरोव्ह यांनी दक्षिण कीव्हमधल्या घराजवळ सापडलेल्या अवशेषांचे दोन फोटो पोस्ट केलेत.
 
अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, आग आटोक्यात
 
रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या झोपोरिजझिया अणुऊर्जा प्रकल्पातल्या इमारतीला आग लागली होती. यामध्ये काहीजण मारले गेल्याचं आणि जखमी झाल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
 
सुदैवाने या आगीमध्ये रिअॅक्टरचं नुकसान झालं नसून गळती वा उत्सर्जन झालं नसल्याचं IAEA ने स्पष्ट केलंय.
 
झोपोरिजझिया हा युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.
रशियाने झपोरिझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे चेर्नोबिल दुर्घटनेच्या सहापट मोठे परिणाम होऊ शकले असते, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
 
तर रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.
 
काल दिवसभरात आणखी काय घडलं?
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला विरोध करणाऱ्या देशांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिलाय. रशियावर आणखी निर्बंध लादत परिस्थिती चिघळवू नका, असा इशारा पुतिन यांनी दिलाय.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मोठं समर्थन मिळालं. कथित युद्ध अपराध (War Crimes) आणि मानवतेच्या विरोधातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय.
सशस्त्र सैन्याबद्दल 'खोटी' माहिती परसवल्यास तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा रशियाच्या संसदेत - डूमामध्ये मंजूर करण्यात आलाय.
रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करत असल्याचे पुरावे असल्याचं नाटोचे जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय.
जेव्हा युक्रेनवर आक्रमणाची पुतिन यांनी घोषणा केली...
24 फेब्रुवारीच्या सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलं.
 
सत्य आणि न्याय हे रशियाच्या बाजूनं आहे. रशियाला घेरण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल, तर रशिया तत्काळ प्रतिक्रिया देईल, असंही पुतीन म्हणाले होते. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी असल्याचंही पुतीनं म्हणाले होते.
 
युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामधील हा संघर्ष अपरिहार्य असून हा केवळ वेळेचा मुद्दा आहे, असंही पुतीन म्हणाले.
 
पुतिन यांच्या घोषणेच्या काही मिनिटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला होता की, कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती