नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (07:30 IST)
नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गातील कुंठेफळ येथील सुमारे 500 मीटर लांबीचा व 33.5 मीटर उंचीच्या मेहेकरी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार आहे.
1997 मध्ये मंजुरी मिळालेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जलद वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मधल्या काळात निधीच्या कमतरतेमुळे या मार्गाचे काम रखडले होते.
मात्र केंद्राप्रमाणे राज्य सरकारही निधी उपलब्ध करून देत असल्याने गेल्या पाच वर्षात या कामाने वेग पकडला आहे. मागील 2 वर्षात नगर ते नारायण डोहो व नारायण डोहो ते सोलापुरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली आहे .
आता या मार्गात येणार्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. आता सोलापुरवाडी ते आष्टी या 32 कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) विजयकुमार रॉय यांनी दिली.