पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोर निर्णय घेणार : मुख्यमंत्री

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (08:00 IST)
पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल. तसेच, जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग,घरे यांचे नुकसान झाले आहे.पुन्हा असे होऊ नये यासाठी तत्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल.महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल.असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
 
महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वूमीवर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडी,अंकलखोप,कसबे डिग्रज,मौजे डिग्रज, आयर्विन पुल, हरभटरोड येथे भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली येथे आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात पूर व्यवस्थापनसाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे,नद्याजोड उपक्रम याबाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेवूनच विकास कामे केली जातील. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापूर व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा सर्वंकष आराखडा सादर केला. २०१९ चा महापूर, कोरोना आणि आता २०२१ चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर आता अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण तरीही पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणे, यासाठी शासन कटीबध्द आहे. सर्व बाबींचा समतोल राखत जनतेच्या सहभागाने आपण या संकटावरही मात करु, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती