अहमदनगर जिल्ह्य़ातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या खुनामुळे भाजप व शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री व नगर जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षां या निवासस्थानी धडकणार असून, पक्ष कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वत:ला अटक करून घेणार आहेत. या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. केडगाव खून प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तेथील सर्व परिस्थितीची माहिती त्यांना दिली. या वेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, खासदार सदाशिव लोखंडे, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या मंगळवारी वर्षां निवासस्थानावर धडक देऊन अटक करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.